पुणे कार अपघाताच्या दिवशी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीचा धक्कादायक खुलासा

Pune Car Accident : पुणे कार अपघात प्रकरणाचे अपघाताचे अनेक धक्कादायक पैलू समोर येत आहेत. घटना घडल्यानंतर येरवडा पोलीस स्टेशनमध्ये त्या पहाटे नेमकं काय घडलं.. याचा खुलासा पहिल्यांदाच झी तासवर एका प्रत्यक्षदर्शीने केलाय.

अरूण म्हेत्रे | Updated: May 30, 2024, 08:07 PM IST
 पुणे कार अपघाताच्या दिवशी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीचा धक्कादायक खुलासा title=

Pune Car Accident : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये अल्पवयीन आरोपीने त्याच्या पोर्श कारने (Porsche Car) रात्रीच्यावेळी एका दुचाकीला धडक दिली. यात दुचाकी चालवणाऱ्या तरुणाचा आणि त्याच्या मागे बसलेल्या तरुणीचा अशा दोघांचाही मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातावेळी हा अल्पवयीन तरुण मद्यधुंद अवस्थेत होता.  अपघातानंतर जमावाने त्या अल्पवयीन आरोपीला पकडून आधी चोप दिला आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं. पण केवळ 15 तासात त्याला जामीन (Bail) मंजूर करण्यात आला. या दोन निरपराधांचा बळी घेण्यास कारणीभूत ठरलेल्या आरोपीला निव्वळ अल्पवयीन असल्याच्या कारणास्तव 300 शब्दांचा निबंध लिहून जामीन कसा काय दिला जाऊ शकतो अशी चर्चा सुरु झाल्यानंतर हे प्रकरण गाजलं आणि आता यात नवनवे खुलासे होऊ लागलते. अपघातावेळी येरवडा पोलीस स्थानकात (Yerwada Police Station) नेमकं काय झालं याचा खुलासा एका प्रत्यक्षदर्शीने केला आहे. 

19 मे 2024 - पहाटे 3.30 वाजता
मद्यधुंद अवस्थेतल्या पोराने कारखाली दोघांना चिरडल्यावर जमावाने त्याला चोपला.आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि मग इथूनच सुरु झाला खरा खेळ

19 मे 2024 - पहाटे 3.40 वाजता
लोकप्रतिनिधीसोबत आरोपीचे वडील म्हणजे बिल्डर विशाल अग्रवाल सोबत होते असा दावा प्रत्यक्षदर्शीने केलाय.

19 मे 2024 - पहाटे 3.45 वाजता
लोकप्रतिनिधीच आरोपीच्या बापासोबत असल्याने मग पोलीसही अॅक्शन मोडवर आले.

19 मे 2024 - पहाटे 4.00 वाजता
पोराने कारखाली दोघांना चिरडल्यावर मोठा जमाव जमा झाला होता. मात्र 'साक्षीदारांना साक्ष न देण्यासाठी धमकावून परत पाठवलं

19 मे 2024 - दुपारी 1.00 वाजता
आरोपीला गजाआड करण्याऐवजी त्याला VIP ट्रिटमेंट देण्यात आली.

19 मे 2024 - दुपारी 2.00 वाजता
दोघांचा जीव घेतला तरीही बड्या बापाचा पोरगा असल्याने आरोपीला खाण्यासाठी चक्क बर्गर मागवण्यात आल्याचं प्रत्यक्षदर्शीने म्हटलंय.

19 मे 2024 - दुपारी 2 वाजल्यानंतर
दारु ढोसून कार चालवत दोघांना चिरडल्यामुळे आरोपीची रक्त चाचणी करणं आवश्यक होतं. मात्र त्याला पोलिसांच्या गाडीतून न पाठवता खासगी गाडीतून ससूनला पाठवण्यात आलं. पाठोपाठ त्या लोकप्रतिनिधीच्या गाड्याही ससूनमध्ये पोहोचल्या.

त्यानंतरच ससूनमध्ये तो ब्लड सॅम्पल बदलण्याचा खेळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. हा प्रत्यक्षदर्शी  साक्षीदार व्हायलाही तयार आहे.  मात्र आपल्या जीवाला धोका असल्याचं त्याने म्हटलंय.