'यहां के भाई लोग हम है...' म्हणत गोळीबार, पुण्यात शिवसेनेच्या कार्यालयावर हल्ला

पूर्व वैमनस्यातून दहशत निर्माण करण्यासाठी स्वत:ला भाई म्हणविणाऱ्या गुंडांनी हातात पिस्तुल घेऊन केला गोळीबार, पोलिसांनी दोन गुंडांना केली अटक

Updated: Dec 30, 2022, 03:07 PM IST
'यहां के भाई लोग हम है...' म्हणत गोळीबार, पुण्यात शिवसेनेच्या कार्यालयावर हल्ला title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : 'यहां के भाई लोग हम है, हमारे नाद को लगे तो जान से हात धो बैठोगे' असं म्हणत पुण्यात (Pune) शिवसेना (Shivsena) अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयावर गोळीबार केला. पुण्यात वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. गुंडांच्या टोळक्याने पूर्ववैमनस्यातून गोळीबार केला. आतिक उर्फ भाई नावाच्या गुंडाने ही फायरिंग (Firing) केली. मुख्य रस्त्यावर येऊन आतिक याने हातात पिस्तुल घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.

पूर्व वैमनस्यातून दहशत निर्माण करण्यासाठी स्वत:ला भाई म्हणविणार्‍याने हातात पिस्तुल घेऊन हवेत गोळीबार केला. याप्रकरणी हडपसरमधल्या सय्यदनगर इथं राहणाऱ्या इम्तियाज अफजल हुसेन शेख यांनी तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन सय्यदनगरमध्येच राहणाऱ्या आतिक इक्बाल शेख, सादीक शेख, हुसेन मुस्तफा कादरी यांच्यावर खूनाचा प्रयत्न आणि आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महंमदवाडी इथल्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख अल्पसंख्याक सेनाच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ गुरुवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला. आरोपी आणि तक्रारदार हे ओळखीचे आहेत. तक्रारदार इम्तियाज यांचा भाऊ इम्रान आणि सादीक शेख याचा भाऊ शब्बीर कादरी यांच्यात 27 डिसेंबरला भांडणं झाली होती. त्याचा राग मनात धरुन अतिक आणि इतर दोघं जण सय्यदनगर इथल्या गल्ली नं 22 मधील कार्यालयात आले.  कार्यालयात कोणी नसताना त्यावर लाथांनी मारुन मुख्य रस्त्यावर येऊन अतिक याने हातात पिस्तुल घेऊन हवेत गोळीबार केला.

पुण्यात गुंडांची दहशत
पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत सिंहगड लॉ कॉलेज परिसरात दोन युवकांनी हातात कोयते घेऊन दहशत निर्माण केली. या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि गुंडांना चांगलाच इंगा दाखवला. गुंड कोयता घेऊन दहशत माजवत होते. जो मिळेल त्याच्यावर हल्ला करत सुटले होते. काही दुकानांचीही या गुंडांनी नासधुस केली. पण, दोन धडाकेबाज पोलिसांनी पाठलाग करून या गुंडांची सगळ्यांसमोर धुलाई केली. पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे पोलिसांचं कौतुक होतंय. या गुंडांच्या हल्ल्यात एक जण जखमी झालाय. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अक्षय इंगवले आणि धनंजय पाटील या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता आरोपींना अद्दल घडवली. यातील एकाने पळ काढला पण, एकाला पकडण्यात यश आलंय.