पुणे : अन्नदाता समजल्या जाणारा 'शेतकरी' पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसण्याच्या तयारीमध्ये आहे.
काही दिवसांपूर्वी सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. त्याची प्रकियादेखील सुरू केली. मात्र अजुनही अनेक शेतकर्यांच्या खात्यामध्ये रक्कम न झाल्याने ते निराश झाले आहेत. अनेक ठिकाणी कर्जमाफीच्या यादीमध्ये घोळदेखील समोर आले आहेत.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातल्या कानगावमधील शेतक-यांनी आता संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय. गावच्या ग्रामसभेत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला. 2 नोव्हेंबरपासून कानगावमधील शेतकरी संपावर जाणार आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत शेतक-यांची फसवणूक झालीय. शेतक-यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी अशी मुख्य मागणी शेतक-यांनी केलीय. त्याचबरोबर शेतमालाला हमी भाव, वीज बिलात सवलत अशा मागण्या देखील आहेत.
पुणतांबा येथील किसान क्रांती समन्वय समितीमधील काही सदस्य या आंदोलनात सहभागी झालेत. नवीन आंदोलन शेतकरी आक्रोश कृती समितीच्या माध्यमातून केलं जाणार आहे.