पुणे : शहरातील सर्वात जुने आणि हेरिटेजचा दर्जा प्राप्त असणाऱ्या फर्ग्युसन महाविद्यालयाला आता विद्यापीठाचा दर्जा प्राप्त होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत फर्ग्युसन महाविद्यालयाला विद्यापीठाचा दर्जा देण्याबाबत मंजुरी मिळाली आहे. पब्लिक प्रायव्हेट युनिव्हर्सिटी या प्रकारचे हे देशातील पहिलेच विद्यापीठ असणार आहे. ज्यामुळे फर्ग्युसन महाविद्यालय आता महाराष्ट्र राज्य फर्ग्युसन विद्यापीठ म्हणून ओळखले जाईल.
स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा मिळावा यासाठी महाविद्यालयाने एकवर्षआधी अर्ज केला होता. ज्याला मे मध्ये 'रुसा'ची मान्यता मिळाली होती. त्यानंतर स्वतंत्र विद्यापीठाचा अहवाल राज्य सरकारला पाठवण्यात आला होता. ज्याला आज राज्यमंत्री मंडळाने याला मान्यता दिली आहे. त्यामुळे फर्ग्युसन कॉलेजला विद्यापीठ म्हणून नावारुपास येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यापीठ म्हणून मान्यता मिळाल्यानंतर शैक्षणिक बदल करता येणार असून ज्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण देण्यावर भर देणार असे संस्थेकडून सांगण्यात आले आहे. तसेच फर्ग्युसन कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी यांनीही तशी माहिती दिली.
- १८८५ साली लोकमान्य टिळक यांच्या पुढाकाराने महाविद्यालयाची स्थापना झाली
- १३० हून अधिक वर्षे जुन्या असलेल्या या महाविद्यालया ने अनेक राजकारणी, साहित्यिक आणि नेते देशाला दिले
- या महाविद्यालयाला अनेक ऐतिहासिक घडामोडींच साक्षीदार म्हटलं जाते
- पुण्यातील नामांकीत महाविदयालयांपैकी एक म्हणून ओळख
- जुलै २०१५ मध्ये हेरिटेज वास्तूचा दर्जा
- २०१६ मध्ये स्वायत्त महाविद्यालय म्हणून मान्यता
- २०१८ मध्ये विद्यापीठ म्हणून मान्यता मिळावी यासाठी अहवाल पाठविण्यात आला
- मे २०१८ मध्ये रुसा ची मान्यता मिळाली
- जानेवारी २०१९ मध्ये राज्य मंत्री मंडळाची मान्यता
- आयआयटी आयआयएम सारख्या संस्था आणि परदेशी विदयापीठांसोबत फर्ग्युसनला टाय अप करता येणार