पुण्यात पूर का येतो? नद्यांच्या विकासकामांचा फटका, की आणखी काही?

Why floods in Pune:  पुण्यात काल पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान पूर का येतो? याची कारणं समोर आली आहेत. 

Pravin Dabholkar | Updated: Jul 26, 2024, 12:04 PM IST
पुण्यात पूर का येतो? नद्यांच्या विकासकामांचा फटका, की आणखी काही? title=
पुण्यात पूर का येतो? (फोटो सौजन्य:PTI)

Why floods in Pune: पुण्यात आज पावसाने विश्रांती घेतलीय.त्यामुळे पुण्यातील पूरस्थिती नियंत्रणात आलीय.कालच्या पुराचा पुणेकरांना मोठा फटका बसलाय.घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं होतं. मात्र, निंबजनगर, एकतानगरमधील पाणी ओसरलंय.त्यामुळे पुणेकरांना थोडासा दिलासा मिळालाय...असं असलं तरी आजही पुण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. आज पुणेकरांना थोडा दिलासा मिळाला असला तरी पुण्यात काल पुरामुळे हाहाकार उडाला होता. खडकवासलामधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्यामुळे काल सिंहगड रोडवरील सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं होतं. पुण्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान पूर का येतो? याची कारणे समोर आली आहेत. 

पुरामुळे काय आहे पुण्यातील स्थिती?

पुण्यात मुळा-मुठा नदीचं पाणी लोकवस्तीत शिरल्याने सर्वाधिक नुकसान हे एरंडवण खिलार वाडीत झालंय. घरातील सर्व काही वाहून गेलंय.धान्य, कपडे, भांडी एवढंच नाही तर विद्यार्थ्यांचं शालेय साहित्यही वाहून गेलंय.मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई दरम्यान धावणा-या तीन ट्रेन आज रद्द करण्यात आल्यात. डेक्कन क्वीन, प्रगती, इंटरसिटी एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे, मुंबई शहरात होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने हा निर्णय घेतलाय.पुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलीये. हवामान विभागानं पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात अतिमुसळधार पावासाचा इशारा दिलाय. त्याअनुषंगानं पुण्यातील शाळांना सुट्टी देण्यात आलीये. तर पुणे विद्यापीठातील आज आणि उद्या होणा-या परीक्षा रद्द करण्यात आल्यात. तसंच लवकरच या दोन दिवसीय परीक्षांचे पुनर्नियोजनाचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असं परीक्षा विभागाकडून सांगण्यात आलंय. तर उर्वरीत परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहेत.

नद्यांचे विकासकाम कारणीभूत?

पुणे शहरातून मुळा आणि मुठा या नद्या वाहतात. मुळा आणि मुठा या 2   नद्यांचा संगम होऊन पुढे ती मुळा-मुठा म्हणून वाहते आणि भिमा नदीला मिळते. पण पुण्यातून वाहणाऱ्या नद्याची स्थिती चांगली नाही. त्यांना नाल्याचं स्वरूप आलेलं दिसतंय. तसेच पुणे शहरातील नदीकाठी गेल्या काही वर्षांपासून शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसतंय. प्रक्रीया न झालेले सांडपाणी तसेच नद्यांमध्ये सोडले जाणे, नदीपात्रात कचरा टाकणे अशी अनेक कारणे पूरस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत असतात. 

चुकीच्या पद्धतीची बांधकामे 

गेल्या काही वर्षात पुणे शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात कॉंक्रिटीकरणं झालंय.पुण्यात काही ठिकाणी ओढे,नाले बुजवण्यात आले आहेत, चुकीच्या पद्धतीने बांधकामे करण्यात आलेली आहेत, ही कारणे पुर परिस्थितीला कारणीभूत असल्याची माहिती समोर आली आहे.

नदीची पाणी वाहून नेण्याची क्षमता 

खडकवासला धरण हे पावणेतीन टीएमसी इतक्या क्षमतेचे आहे. अशावेळी वरच्या भागातच 8 इंचापेक्षा जास्त पाऊस पडलाय. यामुळे एकदम 3 टीएमसी पाणी धरणात आलं. नागरिकांना सोयीचे व्हावे म्हणून रात्रीऐवजी पहाटे धरणाचं पाणी सोडण्यात आलं. पुण्यात सकल भागात पाणी साचलं. सगळीकडेच पाऊस पडल्यामुळे नदीची पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला. नदीच्या दोन्ही बाजूने येणारं पाणी आणि ओढा-नाल्यांमधून येणार पाणी, यामुळे अनेक भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. 

पुण्यातील नेत्यांचं काय म्हणणं?

दरम्यान पुण्यात पूर का आला? याचे कारण केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे. जलसंपदा विभाग आणि महापालिका यांच्यातील समन्वय अभावामुळे पूरस्थिती उद्भवली, असा आरोप केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलाय. आधी पूरस्थिती हातळणार मग चौकशी करून कारवाई करणार, असा इशारा मोहोळ यांनी दिलाय.दरम्यान पुण्याचे आमदार चंद्रकांत पाटलांनी पुण्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. पूरग्रस्तांशी चर्चा करून मदतीचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलंय.नदी सुधारित प्रकल्पामुळे पाणी शिरल्याचं सांगितलं जातंय मात्र, फेक नरेटिव्ह तयार करू नये.नदी सुधारित प्रकल्पामुळे पाणी सोसायटीमध्ये शिरले हे तज्ज्ञांनी सांगावं तज्ज्ञांनी अभ्यास करून अहवाल द्यावा, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी दिलीय.

नागरिकांनी काय केला आरोप?

सोसायटीमध्ये पाणी शिरण्याचा धोका असल्याबाबतची कुठलीच पूर्व सूचना प्रशासनातून देण्यात आली नाही. त्यामुळे पुण्यात पूर आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अचानकपणे पाणी वाढल्याने 200 पेक्षा जास्त लोक पुराच्या पाण्यात अडकले होते. पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचलं आहे. दरम्यान सध्या खडकवासला धरणातून 35000 क्यूसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पाण्याचा विसर्ग रात्रीतून चारपट करण्यात आला आहे. त्यात आवश्यकतेनुसार घट किंवा वाढ होऊ शकते असं पाटबंधारे विभागाकडून कळवण्यात आलं आहे.