Travel News : राकट देशा, कणखर देशा दगडांच्या देशा... या शब्दांत महाराष्ट्राची ओळख करून दिली जाते आणि राज्यातील कडेकपारी, डोंगरदऱ्या आणि कातळाचे डोंगर पाहून याचीच प्रचिती पावलोपावली येते. अशा या महाराष्ट्रात कैक अशाही गोष्टी आहेत ज्या आजच्या काळात पाहताना आपण पुरते भारावून जातो. असंच एक ठिकाण कोणत्याही ऋतूमध्ये राज्याच्या एका टोकाशी पाय घट्ट रोवून उभं आहे. जवळपास दोन हजार वर्षांहून अधिक काळापासून महाराष्ट्रात हे ठिकाण अस्तित्वात आहे आणि त्यानं खऱ्या अर्थानं असंख्य बदल पाहिले आहेत हे म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.
महाराष्ट्रात आजमितीस कैक रस्ते बांधण्यात आले, पण तुम्हाला माहितीये का अनेक हजार वर्षांपूर्वी राज्याचा देशावरील भाग आणि कोकण पट्टा या भागांना जोडणारी एक व्यवहार आणि व्यापारीच अतीव महत्त्वाची वाट जुन्नरमध्ये आकारास आली होती. ही वाट नसून प्रत्यक्षात ही एक पर्वतीय खिंडच. या ठिकाणाचं नाव नाणेघाट/ नानेघाट.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असणाऱ्या या खिंडीचा वापर त्या काळात व्यापारी मार्ग म्हणून केला जात. डोंगर ओलांडून जाणाऱ्या व्यापाऱ्यांकडून इथं टोल वसुली केली जात असेल त्यासाठी इथं टोल देण्याची व्यवस्थाही होती.
महाराष्ट्रातील सर्वात पहिल्या ज्ञात राजवंश असणाऱ्या सातवाहनांच्या साम्राज्याच्या कैक खुणा या नाणेघाटात पाहता येतात. याच नाणेघाटाच्या मुखावर असणारा दगडी रांजण आणि तेथील गुहेत दिसणारे गतकाळातील पुरावे अतिप्रचंड वेगानं आपल्याला सातवाहनांच्याच काळात नेतात. असं म्हणतात की याच रांजणात इथून ये- जा करणारे टोल स्वरुपात नाणी टाकत असत.
नाणेघाटातील ऐतिहासिक रांजण, पुढं दिसणाऱ्या मूर्ती, पाण्याचे साठे, मोठ्या गुहेत कोरलेल्या राणी नागणिकेचा शिलालेख जणू आश्चर्यच.
भारतातील कैक लेखी भाषांचं उगमस्थान असणाऱ्या ब्राह्मीलिपीमध्ये हा शिलालेथ कोरल्याचं तज्ज्ञ सांगतात. नाणेघाटात असणाऱ्या शिलालेखांमध्ये तत्कालीन शाही कुटुंबातील सदस्यांची नावं सुचवतात. तर, काही लेख तत्कालीन पराक्रमांची साक्ष देतात. असा हा नाणेघाट हिवाळा आणि पावसाळ्यात त्याच्या रुपानं जितकी भुरळ पाडतो तितकाच तो उन्हाळ्यामध्ये थरकाप उडवतो.
कल्याण-मुरबाड-टोकवडे-वैशाखरे-नाणेघाट अशा टप्प्यानं तुम्ही इथं पोहोचू शकता. पुण्यापासून हा घाट साधारण 90 किमी अंतारावर आहे. तर, मुंबईपासून इथं स्वत:च्या वाहनानं पोहोचण्यासाठी पाच तासांचा कमाल वेळ लागतो. समुद्रसपाटीपासून 2750 फूट उंचीवर असणाऱ्या नाणेघाटात मुंबई मार्गानं आल्यास वैशाखरे हे तळाचं गाव ठरतं, तर पुण्याकडून आल्यास तुम्ही घाटघर गावात पोहोचता. काय मग, या अतिप्रचंड पुरातन टोलनाक्याला भेट द्यायला तुम्ही कधी येताय?