ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला? ट्विट करुन दिली माहिती

Kalyan Constituency:  महायुतीचा उमेदवार ठरायच्या आधीच महाविकास आघाडीने येथे बाजी मारली का? असा प्रश्न उपस्थित होतोय. 

Updated: Apr 1, 2024, 02:26 PM IST
ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला? ट्विट करुन दिली माहिती title=
Kalyan Constituency

Kalyan Constituency: ठाणे आणि कल्याण लोकसभा जागेवरुन भाजप आणि शिंदे गटात एकमत होत नाहीय. ही जागा स्वत:कडे असावी, असे दोघांनाही वाटतंय. या जागेवर दावा करण्यासाठी बैठकांवर बैठका घडत आहेत. पण अद्याप प्रश्न सुटल्याचे काही समोर आले नाहीय. असे असताना दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभा जागेचा उमेदवार ठरल्याचे वृत्त आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवार ठरायच्या आधीच महाविकास आघाडीने येथे बाजी मारली का? असा प्रश्न उपस्थित होतोय. 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक अयोध्या पौळ पाटील यांनी आपल्या अधिकृत एक्स (आधीचे ट्विटर) अकाऊंटवरुन एक पोस्ट केली आहे. या पोस्टने खळबळ उडवून दिली आहे. आपण कल्याण लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत असल्याचा दावा त्या या पोस्टमध्ये करत आहेत. 

काय म्हणाल्या अयोध्या पौळ?

पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आशिर्वादाने मशाल चिन्हावर शिवसेनेकडून कल्याण लोकसभा लढवत आहे, असे त्या आपल्या पोस्टमध्ये म्हणत आहेत. ज्यांच्याकडे ईडी, आयटीसारखी ताकद आहे असा स्वयंघोषित जागतिक स्तराचा सर्वात मोठा पक्ष युतीसोबत आहे. अशा मुख्यमंत्र्याच्या खासदार मुलाच्या विरोधात संधी दिल्याबद्दल त्यांनी पक्षातील वरिष्ठांचे आभार मानले आहेत. विशेष म्हणजे या पोस्टमध्ये अयोध्या पौळ यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, वरुण सरदेसाई आणि साईनाथजी दुर्गे यांचे आभार मानले आहेत.

अयोध्या पौळ यांच्या ट्विटवर अनेकजण त्या एप्रिल फूल करत असल्याचे म्हणत आहेत. 

महायुतीतील ठाणे आणि कल्याण लोकसभेचा वाद मिटला, शिंदे गटाला 'या' जागेचा दावा सोडावा लागणार

पक्षाकडून फेटाळला दावा

अयोध्या पौळ यांनी सोशल मीडियात केलेल्या दाव्यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील वरिष्ठांना विचारण्यात आले. पण त्यांनी हा दावा फेटाळला आहे. अद्याप अशी कोणतीही उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. यासंदर्भात बैठक सुरु असून अधिकृतरित्या याची माहिती कळवण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

एप्रिल फूल?

त्यामुळे अयोध्या पौळ यांनी 1 एप्रिलचा फायदा घेत आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली? की विरोधक आणि फॉलोअर्सचे मत जाणून घेतले? की त्यांना कोणी असं ट्वीट करायला सांगितलं? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.