धक्कादायक! पुण्यात भरदिवसा तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, विरोध केल्याने सिगारेटचे चटके

भरदिवसा महाविद्यालयीन तरुणीसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, विरोध केल्याने सिगारेटचे चटके

Updated: Apr 7, 2022, 11:35 AM IST
धक्कादायक! पुण्यात भरदिवसा तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, विरोध केल्याने सिगारेटचे चटके title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : सांस्कृतित शहर, विद्येचं माहेरघर अशी बिरुदावली मिरवणाऱ्या पुण्यात गेल्या काही दिवसात गुन्हेगारीने कहर केला आहे. गुंडांना कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिला आहे का असा प्रश्न आता सामान्य पुणेकर विचारु लागले आहेत. आज आणखी एक धक्कादायक घटना पुण्यात समोर आली आहे. 

महाविद्यालयात जाण्यासाठी निघालेल्या तरुणीचा रिक्षाचालकाकडून भरदिवसा विनयभंग करण्यात आला इतकंच नाही तर विरोध केल्यामुळे या तरूणीच्या दंडाला सिगारेटचे चटके देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील आयनॉक्स मॉल समोर धावत्या रिक्षात हा प्रकार घडला.

पीडित तरुणी रिक्षाने महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली होती. रिक्षाचालक आणि पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने तिच्या गळ्यात हात टाकून विनयभंग केला. त्यानंतर पीडित तरुणीने आरोपीला रिक्षा थांबवण्यास सांगितली. पण रिक्षा थांबून रिक्षाचालकाने पाठीमागे येऊन तिच्या सोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.  

पीडित तरुणीने आरडाओरडा केला असता आरोपीने पेटत्या सिगारेटचे चटके तिच्या दंडाला दिले. यानंतर लाथा बुक्क्यांनी तिला मारहाण करून रिक्षातून खाली ढकलून पळ काढला. बंडगार्डन पोलिस ठाण्यात या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.