अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे : पुण्यातल्या एमआयटी शाळेनं इंग्रजी माध्यमातली शाळा एसएससी बोर्डाऐवजी सीबीएसई बोर्डाशी संलग्न करण्याची तयारी सुरु केली आहे. मात्र पालकांनी याला विरोध केला आहे. केवळ फी वाढविण्यासाठी हा घाट घातला असल्याचा पालकांचा आरोप आहे.
पुण्यातल्या कोथरुडमधली एमआयटी शाळा पुन्हा वादात अडकली आहे. या शाळेत इंग्रजी आणि मराठी माध्यमात मिळून तब्बल 4000 विद्यार्थी शिकतात. त्यातली इंग्रजी माध्यम एसएससी बोर्डाकडून सीबीएससी बोर्डाशी संलग्न करण्यासाठी शाळा गेल्या दीड वर्षापासून प्रयत्न करतेय. शाळेने सीबीएससी बोर्डाच्या अधिका-यांना नुकतंच शाळेच्या इन्स्पेक्शनसाठी बोलावलं. मात्र यावेळी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना सुट्टी देऊन शाळेत फक्त एकच माध्यम शिकवलं जातं असा दिखावा करण्यात आल्याचा आरोप आहे.
शाळा एसएससी बोर्डात रहावी की सीबीएससी यासाठी शाळेत निवडणूकही घेण्यात आली. ज्यामध्ये 80 टक्के पालकानी शाळा राज्य बोर्डाकडेच रहावी यासाठी मतदान केलं. मात्र तरीही शाळा आपल्या निर्णयावर ठाम आहे. मात्र शाळा प्रतिक्रिया द्यायला तयार नाही.
एका बाजूला मराठी शाळांना घरघर लागलेली असताना आता राज्य शिक्षण मंडळाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळाही सीबीएससी बोर्डाकडे वळत आहेत. मगशिक्षण सर्वसामान्यांना परवडणारं राहणार का हा प्रश्न आहे.