पुणे मनपाची निविदा रद्द, आयुक्तांना चपराक

पुणे महापालिकेच्या समान पाणी पुरवठा योजनेची निविदा मुख्यमंत्र्यांनी रद्द केलीय. त्यामुळं पालिकेचे पदाधिकारी आणि आयुक्तांना जोरदार चपराक बसलीय. 

Updated: Aug 3, 2017, 05:11 PM IST
पुणे मनपाची निविदा रद्द, आयुक्तांना चपराक title=

पुणे : पुणे महापालिकेच्या समान पाणी पुरवठा योजनेची निविदा मुख्यमंत्र्यांनी रद्द केलीय. त्यामुळं पालिकेचे पदाधिकारी आणि आयुक्तांना जोरदार चपराक बसलीय. 

या निविदा प्रक्रियेच्या कथित गैरव्यवहाराचं वृत्त झी २४ तासनं प्रसारित केलं होतं. त्यानंतर विरोधकांनी हा मुद्दा आक्रमकपणे लावून धरला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत भाजप पदाधिकारी आणि महापालिका अधिका-यांची मुंबईत बैठक बोलवली. 

या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतला.  चोवीस तास समान पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनच्या चार निविदा महापालिकेनं काढल्या होत्या. 

यात सतराशे कोटी रुपयांच्या चार निविदांसाठी सत्तावीस टक्के चढ्या दरानं टेंडर भरण्यात आलं होतं. पाचशे कोटींची ही वाढ होती. 

तरीही या निविदा मंजूर करण्याचा सत्ताधारी आणि प्रशासनाचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. भाजप खासदार संजय काकडे यांनीही या निविदा प्रक्रीयेला आक्षेप घेतला होता.