पुण्यातल्या बोगस ब्ल्यू बेल्स शाळेचा आणखी एक कारनामा उघड, शाळेचा मान्यता नंबर म्हणून दिला...

Pune Bogus Schools: ब्ल्यू बेल्स शाळेवर गुन्हा दाखल केला जाणार असून शिक्षणाधिकाऱ्यांनी तसे आदेश दिले आहे. या शाळेने मान्यता नंबर म्हणून दिलेला नंबर बोगस आढळला आहे. 

Updated: Apr 20, 2023, 04:31 PM IST
पुण्यातल्या बोगस ब्ल्यू बेल्स शाळेचा आणखी एक कारनामा उघड, शाळेचा मान्यता नंबर म्हणून दिला...  title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यातील कोंढवा इथली ब्ल्यू बेल्स ही शाळा (Blue Bells School) अनधिकृत असल्याचं समोर आलं आहे. यानंतर जाग आलेल्या शिक्षण विभागाने पुणे (Pune Education Department) विभागातील महाराष्ट्र बोर्डाच्या स्वयंअर्थसहाय्यित शाळांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रामुख्याने शाळांच्या मान्यतांची पडताळणी करण्यात येणार आहे. केंद्रीय तपास संस्थेने ब्ल्यू बेल्स शाळेचे दोन मजले सील केल्यानंतर शालेय शिक्षण विभागालाही कारवाई करण्यासाठीची जाग आली आहे. 

मान्यता नंबर मेडिकल बिलाचा
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी ब्ल्यू बेल्स शाळेचं मान्यतापत्र तपासलं. त्यावेळी संबंधित मान्यतापत्राची पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात नोंदच नसल्याचे समोर आलं आहे. मान्यतापत्रावर तत्कालीन शिक्षण उपसंचालक प्रवीण अहिरे यांची स्वाक्षरीही बनावट असल्याची आढळली आहे. सेवा फाउंडेशनने सन 2019 मध्ये ब्ल्यू बेल्स हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज सुरू केलं होतं. धक्कादायक म्हणजे या शाळेच मान्यता नंबर हा एका मेडिकल बिलाचा असल्याचं तपासात उघड झाला आहे. त्याचबरोबर शाळेवर शिक्षणाधिकारी गुन्हा दाखल करणार आहेत. शाळेत शिकणाऱ्या मुलांचा स्थलांतर हे दुसऱ्या शाळेमध्ये केलं जाईल अशी माहिती औदुंबर उकिरडे यांनी दिली आहे. 

800 शाळांची कागदपत्र संशयास्पद
राज्यात सीबीएसईच्या 1 हजार 300 शाळांच्या 'एनओसी' (NOC) तपासण्यात आल्या. यात सुमारे 800 शाळांची कागदपत्रे संशयास्पद आढळून आली आहे. काही शाळांच्या 'एनओसी'ही बोगस आढळून आलेल्या आहेत. त्यानंतर पुण्यातील 300 शाळा महाराष्ट्र बोर्डाच्या 300 स्वयंअर्थसहाय्यित शाळा असून या सर्वच शाळांची तपासणी करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. आणखी काही शाळांकडील मान्यतापत्र बोगस असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

हेही वाचा : आरोग्य खात्यातला 'मुन्नाभाई' वैद्यकिय शिक्षण नसतानाही चक्क 5 वर्ष आरोग्य अधिकारी म्हणून सेवेत

शाळेत दहशतवादी ट्रेनिंग
पुण्याच्या कोंढवा भागातील के. झेड नॉलेज सेंटर या इमारतीच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर दहशतवादी कारवायांचं प्रशिक्षण दिलं जात असल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं होतं. प्रशिक्षण शिबिरे आणि तरुणांना सरकार तसंच विशिष्ट समुदायाचे नेते आणि संघटना यांच्या विरोधात भडकवण्याचे केलं जात होतं. एनआयएनं कारवाई करुन दोन मजले सील केले धक्कादायक म्हणजे त्याच इमारतीत 'ब्लू बेल' नावाची शाळा चालवली जाते. ही शाळा अनधिकृत असल्याचं उघड झालं होतं.