Pune Crime News: पुण्यात पुन्हा एक खळबळजनक प्रकार घडला आहे. आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून भावानेच बहिणीच्या पतीची निर्घृणपणे हत्या केली आहे. इतकंच नव्हेतर त्याच्या हत्येनंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याकरता मृतदेह जाळण्यात आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहिणीने आंतरधर्मीय विवाह केल्याचा राग आरोपीच्या मनात होता. त्यातूनच त्याने मेहुण्याला संपवण्यासाठी दुसरा मेहुणा आणि चुलत भाऊ यांच्या मदतीने बहिणीच्या पतीच्या हत्येचा कट रचला. पोलिसांनी सुशांत गोपाळ गायकवाड, गणेश गायकवाड आणि पंकज विश्वनाथ पाईकराव यांना पिंपरी- चिंचवडच्या भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. अमीर मोहम्मद शेख हत्या झालेल्या व्यक्तीच नाव आहे.
अमीर ने सुशांतच्या बहिणीशी आंतरधर्मीय विवाह केला होता. जो गायकवाड कुटुंबाला मान्य नव्हता. हाच राग मनात ठेवून सुशांतने दुसऱ्या बहिणीच्या नवऱ्याला हाताशी धरून मेहुण्याची हत्या केली आहे. कुटुंबीयाची या लग्नाला परवानगी नव्हती. त्यामुळं लग्नानंतर अमीर शेख आणि त्याच्या पत्नीने दुसऱ्या ठिकाणी घरं घेतलं आणि तिथे राहू लागले. याच दरम्यान सुशांतच्या दुसऱ्या बहिणीच्या पतीने अमीरसोबत जवळीक वाढवली.
15 जून रोजी अमीर शेख कंपनीत जातो असं सांगून घरातून निघाला. तेव्हा अमीरला मुलीच्या भावाने थांबवले आणि त्याला दारू पिण्याच्या बहाण्याने घेऊन गेला. दारू घेतल्यानंतर मुलीचा भाऊ आणि अन्य दोघ जण आळंदी चाकण रोडच्या जंगलात पोहोचले आणि तिथे जाऊन मद्यपान करु लागले. त्यानंतर मुलीच्या भावाने अमीरला बेदम मारहाण केली. त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आली. तसंच, पुरावे मिटवण्यासाठी त्याच्या मृतदेहावर डिझेल टाकून त्याला पेटवण्यात आले. त्यानंतर हाडं आणि राख एका गोणीत भरुन वाहत्या नदीत फेकून दिले.
अमीर शेख कामावरुन घरी परतला नाही म्हणून त्याच्या पत्नीने भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तर एकीकडे अमीरच्या वडिलांनी मुलाचे अपहरण करुन त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करुन तपास सुरू केला.
पोलिसांनी पंकज आणि सुशांतला हिंगोली आणि लोणावळातून अटक केली आहे. तर, तिसरा आरोपी गणेश फरार होता. गणेश हा मुलीचा चुलत भाऊ आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. तसंच, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी डिझेल देणारादेखील अटक करण्यात आली आहे. हा सर्व कट मुलीचा भाऊ सुशांत याने रचला होता.