नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : दीडशे वर्षांहून जुने आणि तब्बल अठराशे देशी आणि परदेशी वृक्ष असलेलं पुण्यातलं जुनं एम्प्रेस गार्डन... या गार्डनचा लचका तोडण्याचा डाव आखला जातोय. वरिष्ठ सरकारी अधिका-यांसाठी इथे निवासस्थानं उभारण्याचा घाट घातला जातोय.
२०० वर्षे जुना महाकाय वड... कांचनवेलीसारख्या दुर्मीळ वेली... गोरख चिंच, रक्तरोहिडा, मलेशियन मॅपल असे हजारो प्रकारचे वृक्ष, वेली... हे वैभव आहे पुण्याच्या एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनचे... जवळपास ४० एकरवर ही सुंदर बाग विस्तारली आहे. मात्र, आता या सौंदर्याचा बळी देण्याचे आराखडे तयार केले जात आहेत. १० एकर जागेवर अधिकाऱ्यांची निवासस्थानं उभारली जाणार आहेत. सरकारच्या या प्रस्तावाला सर्वच स्तरातून विरोध होतोय. काँग्रेसने याला विरोध केलाय.
'अॅग्री हॉर्टीकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया' मागच्या सव्वाशे वर्षांपासून एम्प्रेस गार्डनचं व्यवस्थापन पाहात आहे. या बागेची मूळ जागा ५५ एकरची घोड्यांचा तबेला, रस्ता, कालवा, वन खात्याचं संशोधन केंद्र अशा विविध कारणांसाठी यातली १६ एकरची जागा आधीच बळकावण्यात आली. आता आणखी १० एकर जागा सरकारला हवीय. तीही दुर्मीळ वृक्षराजीवर कुऱ्हाड चालवून...
जिल्हाधिकारी सौरभ राव यांना मात्र हे आरोप मान्य नाहीत. एम्प्रेस गार्डनची ४० एकरांची जागा सोडून ही जागा आहे, असं राव यांचं म्हणणं आहे. या दहा एकर जागेवर अतिक्रमणं होऊ लागली आहेत. त्यामुळे या जागेवर अधिकाऱ्यांची निवासस्थानं बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.
वृक्षसंपदेला हात न लावता बांधकाम केलं जाणार आहे, असा दावा जिल्हाधिकाऱ्यांनी केलाय. तसंच 'अॅग्री हॉर्टीकल्चर सोसायटी'ला ही जागा हवी असल्यास आणि त्यांनी प्रस्ताव दिल्यास त्यावर विचार करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलंय. मात्र, कोणत्याही परिस्थितीत दुर्मिळ आणि शेकडो वर्षांची वृक्षसंपदा नष्ट होऊ नये, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे.