Pune Porsche Accident Teen Driver Timetable: कल्याणी नगरमध्ये झालेल्या पोर्शे कारच्या भीषण अपघातानंतर अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करुन त्याला बालसुधारगृहामध्ये पाठवण्यात आलं आहे. या मुलाला 5 जूनपर्यंत बालसुधारगृहामध्ये ठेवलं जाणार आहे. या मुलाला बालसुधारगृहामध्ये देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. बालसुधारगृहामध्ये या तरुणाचं वेळापत्रक कसं असेल याची माहिती समोर आली आहे.
"चाइल्ड इन कॉन्फिक्ट विथ लॉ (सीसीएल) ला तातडीने येरवाड्यातील नेहरु उद्योग केंद्रातील बालसुधारगृहात देखरेखीखाली ठेवण्यात यावं. तिथे तो इतर बालकांबरोबरच राहील," असं बालसुधारगृहाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. बुधवारी पुण्यातील बालन्यायालय मंडळाने अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द केल्यानंतर त्याला बालसुधारगृहात हलवण्यात आलं. सत्र न्यायालयाने या मुलाच्या वडिलांना म्हणजेच बिल्डर विशाल अग्रवालला 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आता बालसुधारगृहात रवानगी करण्यात आलेल्या या अल्पवयीन मुलाचं वेळापत्रक हे येथील इतर मुलासारखं असेल. हे वेळापत्रक कसं असतं पाहूयात...
> या अल्पवयीन मुलाला ज्या बालसुधारगृहात ठेवण्यात आलं आहे तिथे 30 अल्पवयीन मुलं आहेत.
> या बालसुधारगृहातील दिवस सकाळी सकाळी 8 वाजल्यापासून सुरु होतं असं न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. सकाळी 8 वाजता या मुलांना अंडी, दूध, पोहे, उपमा असा नाश्ता दिला जातो.
> त्यानंतर सकाळी 11 वाजता सार्वजनिकरित्या एकत्र येऊन प्रार्थना केली जाते. नंतर हा अल्पवयीन मुला भाषा शिकवणीला हजेरी लावले.
> समोर आलेल्या माहितीनुसार, दुपारचं जेवण झाल्यानंतर या अल्पवयीन मुलांना दुपारी चार वाजेपर्यंत त्यांच्या डॉमेट्रीमध्ये विश्रांती घेण्याची परवानगी दिली जाते.
नक्की वाचा >> 'अजित पवारांचे ‘फंटर’ आमदार टिंगरे त्या बेवड्या मुलास..'; पोर्शे अपघातावरुन ठाकरे गटाचा टोला
> सायंकाळी 4 वाजता पुन्हा हलका नाश्ता दिला जातो. त्यानंतर एक तास टीव्ही पाहण्याची मूभा असते. नंतर पुढील दोन तास मैदानी खेळांसाठी दिले जातात. या बालसुधारगृहामध्ये व्हॉलीबॉल आणि फुटबॉल खेळायला देतात, असं एनडीटीव्हीने म्हटलं आहे.
> त्यानंतर सात वाजता या मुलांना रात्रीचं जेवण दिलं जातं. रात्रीच्या जेवणामध्ये भात, चपाती, भाज्या दिल्या जातात. रात्री आठ वाजता या मुलांना झोपण्यासाठी त्यांच्या डॉमेट्रीमध्ये पाठवलं जातं.
> वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालसुधारगृहामध्ये या अल्पवयीन मुलांच्या मानसिक चाचण्याही घेतल्या जातात.
वकील प्रशांत पाटील यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, ठरलेल्या काळावधीसाठी नियोजित वेळापत्रकानुसार अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात ठेवलं जातं. "बोर्डाने मानसिक तज्ज्ञ, समोपदेशकने सीसीएलला मानसिक आरोग्यासाठी हवा तो पाठिंबा देणं आणि मदत करणं आवश्यक असतं. यामुळे अशा मुलांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत होते."