Pune Teen Suicide: मैदानी खेळांऐवजी मुलांना मोबाईल, लॅपटॉपची सवय लागणे किती महागात पडू शकते, याची प्रचिती पुण्यातील एका कुटुंबाला आलीय. यात त्यांनी आपला मुलगा गमावला आहे. या मुलाला मोबाईलवरील ऑनलाईन गेम्सचं व्यसन इतकं जडलं होतं की हळुहळू गेम्सने त्याच्या मनावर ताबा घ्यायला सुरुवात केली आणि मुलाचं आयुष्य संपलं. पुणे शहर यामुळे हादरलंय. मुलाच्या पालकांनी जड अंतकरणाने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेची सविस्तर माहिती घेऊया.
पुण्याजवळील पिंपरी चिंचवड शहरात 16 वर्षाच्या मुलाने 14 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. यामुळे आईवडिलांना मोठा धक्का बसला. दोघांनीही टाहो फोडला. पण आता वेळ निघून गेली होती. कोणाला दोष देण्याने आपला लेक परत येणार नव्हता, याची पालकांना जाणिव झाली. दरम्यान पोलिसांना मुलाने लिहिलेली डायरी सापडली. पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली. आमच्या मुलाला ऑनलाईन गेमिंगचं व्यसन जडलं होतं, अशी माहिती मुलाच्या पालकांनी पोलिसांना दिली.आम्हाला मुलाच्या घरातून एक कथित सुसाईड नोड सापडली आहे. त्यात त्याने 'लॉग आऊट' असं लिहून ठेवलं होतं. अल्पवयीन मुलाने नोटमध्ये एक्सडी असेदेखील लिहिले होते. हा कोणतातरी ऑनलाईन गेम्स संदर्भातील शब्द असावा, जो गेम हा मुलगा खेळत होता. आम्ही आत्महत्येच्या मूळ कारण शोधत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिली.
गुरुवारी मध्यरात्री अल्पवयीन मुलाने आपल्या आयुष्याचा प्रवास संवला. हा मुलगा एका स्थानिक शाळेत दहावीमध्ये शिकत होता. त्याचे वडील एका नायझेरियन कंपनीत काम करतात तर आई एक इंजिनीअर तसेच गृहिणी आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलाचा लॅपटॉप जप्त केलाय. या लॅपटॉपचा पासवर्ड मिळवण्यासाठी पोलीस सायबर तज्ञांची मदत घेत आहेत.
अल्पवयीन मुलाच्या नोटबुकमध्ये पोलिसांना 3 चित्र सापडली आहेत. ही आत्महत्या कशाप्रकारे घडली असेल, याचा अंदाज यातून पोलिसांना लावता येतोय. हे चित्र कधी काढले असेल? याचादेखील पोलीसांनी तपास केला. आत्महत्येच्या दिवशी त्याचा कसा दिनक्रम होता? त्याने काय काय केलं? कोणाशी बोलला? ही माहिती मिळवली जात आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ऑनलाईन गेमने आमच्या मुलाचा जीव घेतलाय. आमचा मुलगा तब्येतीने मजबूत होता. बेडवर उभा राहून उडी मारायची असेल तरी तो खूप गोंधळ घालायचा. त्यामुळे 14 व्या माळ्यावरुन उडी मारावीशी वाटणे हे अशक्य आहे. त्याला समोरुन कोणीतरी तसे करण्यास भाग पाडत होते, अशी प्रतिक्रिया मुलाच्या वडिलांनी दिलीय. त्या दिवशी पावसामुळे शाळा बंद होती. शाळेचा अभ्यास करण्यासाठी मी त्याला लॅपटॉप दिला होता. आता शिक्षण ऑनलाईन झाल्याने या वस्तू गरज बनल्या आहेत. मागच्या 6 महिन्यांपासून तो खूपच चिडचिड करायचा. बोलायला गेलं की रागवायचा. अंगावर यायचा. मला त्या गेम्समधलं काही कळतं नव्हतं. पण त्या गेमनेच त्याचा जीव घेतलाय. आपण डिजिटल इंडिया म्हणतो पण अशाप्रकारे ऑनलाईन गेमिंगमुळे मुलांचे जीव जात असतील तर हे गंभीर असल्याची प्रतिक्रिया अल्पवयीन मुलाच्या आईने दिली आहे.