पुणे : पुण्यातल्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी एक नवा जालीम उपाय पुण्यातल्या अमनोरा पार्कमध्ये करण्यात आला होता. चुकीच्या बाजूनं येणा-या बहाद्दरांना रोखण्यासाठी पुण्यातील अमानोरा पार्क सिटीनं शोधलेला जालीम उपाय आठवड्याभरातच मागे घ्यावा लागलाय. एकेरी वाहतूक असलेल्या रस्त्यावर विरुद्ध दिशेनं येणाऱ्या वाहनांना रोखण्यासाठी टायर किलर्स बसवण्यात आले होते. त्यामुळे विरुद्ध बाजूनं येणारं वाहन त्या टायर किलरवरून गेल्यास टायरचं हमखास नुकसान होईल, अशी त्याची रचना होती. अमानोराचा हा प्रयोग सर्वत्र व्हायरल झाला होता.
वाहतूक पोलिसांना त्याची माहिती मिळताच त्यांनी, मात्र अमानोराच्या व्यवस्थापनावर कारवाईचा बडगा उगारला. हे टायर किलर्स बेकायदा असल्याचं सांगत ते तात्काळ काढून टाकण्याच्या सूचना अमानोरा व्यवस्थापनाला पोलिसांनी केल्यामुळे ते बहुचर्चित टायर किलर्स आज काढून टाकण्यात आले.