उच्छादी माकडाला पकडण्यासाठी गांधीगिरी

माकडाला लाठ्याकाठ्या घेऊन पकडण्याचे मार्ग संपल्यावर गांधीगिरीचा मार्ग पुढे आला.

Updated: Aug 20, 2018, 03:22 PM IST

जुन्नर : जुन्नरमधल्या एका माकडानं प्रचंड उच्छाद मांडला होता, त्याला पकडता पकडता वनविभागाच्या अगदी नाकी नऊ आले होते. पण त्यासाठी एक महिला वनसंरक्षक धाडसानं पुढे आली आणि  एक अनोखी शक्कल लढवत या माकडाला जेरबंद करण्यात आलं. माकडाला लाठ्याकाठ्या घेऊन पकडण्याचे मार्ग संपल्यावर गांधीगिरीचा मार्ग पुढे आला आणि त्यासाठी ओझरमध्ये वनसंरक्षक म्हणून काम करणाऱ्या कांचन ढोमसे पुढे आल्या.

मक्याच्या कणसाचं आमिष

 कांचन यांनी वानराला गरमगरम मक्याच्या कणसाचं आमिष दाखवलं. त्या स्वत: वानराजावळ गेल्या. मक्याचं कणीस खायला वानर त्यांच्या जवळ गेलं आणि वानरानं चक्क कांचन यांच्याशी खेळायला सुरुवात केली. खरं तर माकड एवढ्या जवळ आलंय म्हटल्यावर भीती वाटणं स्वाभाविक होतं, पण कांचन अजिबातच घाबरल्या नाहीत, उलट मोठ्या धाडसानं आणि तितक्याच प्रेमानं त्या वानराला आपलसं केलं.

दोघेही सुरक्षित 

कांचन ‘त्या ‘ वानराला घेऊन स्वतः पिंजऱ्यात गेल्या. कांचन यांना स्वत:ला पिंजऱ्यात कोंडून घ्यावं लागलं. दोघेही पिंजऱ्यात अडकल्यानंतर इतर कर्मचाऱ्यांनी दोघांमध्ये तारेचं कुंपण तयार केलं. त्यानंतर वानराला एका बाजूला ठेवत कांचन पिंजऱ्यातून बाहेर आल्या. आज वानर आणि कांचन दोघेही सुरक्षित आहेत.