पाच वर्ष वापरली खोटी नंबरप्लेट, भाजप नगरसेवकाचा प्रताप

रजिस्ट्रेशन फी आणि रोड टॅक्स वाचवण्यासाठी...

Updated: Aug 10, 2018, 02:02 PM IST
पाच वर्ष वापरली खोटी नंबरप्लेट, भाजप नगरसेवकाचा प्रताप

ठाणे : 'आरटीओ'कडे नोंदणी न करता आणि खोटी नंबर प्लेट लावून गाडी वापरल्याप्रकरणी ठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांच्यावर श्रीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. धक्कादायक म्हणजे, तब्बल पाच वर्ष हे नेते महोदय गाडी खोट्या नंबरप्लेटसहीत वापरत होते. श्रीनगर पोलिसांनी दोन कार ताब्यात घेतल्या आहेत.

विलास कांबळे ज्या नंबरप्लेटसहीत गाडी वापरत होते त्या नंबरची खरी गाडी डोंबिवलीत आहे. रजिस्ट्रेशन फी आणि रोड टॅक्स वाचवण्यासाठी त्यांनी गाडीची पासिंगच केली नव्हती... आणि आपल्या मनाप्रमाणे भलताच नंबर लावून तब्बल पाच वर्ष ते ही गाडी वापरत होते. 

याबाबत माहिती मिळताच पोलिसांकडून गाडीचा मालक एकनाथ शेळके आणि नगरसेवक विलास कांबळे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र, अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. 

कांबळे यांनी शेळके याच्या नावावर गाडी घेतली असून गाडीच्या कर्जाचे हफ्ते कांबळे स्वतः भरत असल्याची बाब पोलीस तपासात उघड झालीय.