अहमदनगर : काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आज भाजपमध्ये सामील होतील, अशी चर्चा होती. पंतप्रधान मोदींच्या सभेच्या वेळी राधाकृष्ण विखे व्यासपीठावर उपस्थित राहून भाजपमध्ये दाखल होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र प्रत्यक्षात मोदींच्या सभेत राधाकृष्ण विखे पाटील व्यासपीठावर आलेच नाहीत. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना खीळ बसली. दरम्यान, त्यांचा मुलगा सुजय याने भाजपमध्ये प्रवेश केला. सुजय विखे यांनी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी तयारी केली होती. मात्र, अहमदनगर लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीकडे असल्याने संधी मिळाली नाही. आपल्याला उमेदवारी मिळाली नाही तरीही आपण अपक्ष लढणार असा पवित्रा घेतला. त्याआधी ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे राष्ट्रवादीवर दबाब वाढविण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा उपयोग झाला नाही. काँग्रस रक्तात आहे. त्यामुळे भाजपमध्ये जाणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. मात्र, काही दिवसात त्यांनी आपल्या वक्तव्यावर पलटी मारत भाजपमध्ये प्रवेश केला.
राधाकृष्ण विखे यांचं सभेआधी तळ्यात मळ्यात सुरू असल्याचे दिसून येत होते. आपण सभेच्या नियोजनात असून वेळ मिळाल्यास सभेच्या ठिकाणी जाण्याचा निर्णय ऐनवेळी घेऊ, असे विखेंनी सकाळीच जाहीर केले होते. मात्र सभेच्या व्यासपीठावर न आल्यामुळे म्हटल्याप्रमाणे विखेंना वेळ मिळाला नाही, हे स्पष्ट झाले आहे. योग्यवेळ आल्यावर बोलू असे सूचक विधान विखे पाटील यांनी झी २४ तासशी बोलताना केले आहे.
दरम्यान, राधाकृष्ण विखे - पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर मिळालेले विरोधी पक्षनेते पद हातचे जाईल, या भीतीने त्यांनी भाजपमध्ये सध्या तरी न जाण्याचा निर्णय घेतला नसल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. दिवाळीच्या दरम्यान विधानसभा निवडणुकी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत विरोधी पक्ष पदावर राहण्यासाठी राधाकृष्ण विखे-पाटील यांचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी आजचा प्रवेश उद्यावर ढकल्याची चर्चा नगरमध्ये आहे.
दरम्यान, अहमदनगरच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर तुफान हल्लाबोल केला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनं फुटिरतावाद्यांशी हातमिळवणी केली आहे. वर्षानुवर्षे काँग्रेसने हेच काम केलंय त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा नाही. मात्र, शरद पवारांना काय झालंय? केवळ जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठीच त्यांनी पक्षाचं नाव राष्ट्रवादी ठेवलंय का? अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनगरच्या सभेत सवाल विचारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप उमेदवार सुजय विखे पाटील, शिर्डीचे शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडेंच्या सभेसाठी अहमदनगरमध्ये आले होते. पंतप्रधानांनी या सभेत काँग्रेसला कायमसाठी हटवा असे आवाहन केले आहे.