आभासी जगात वावरणाऱ्यांना राहुल गांधींचा महत्वपूर्ण सल्ला

विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आज पुण्यातील हडपसर येथील महालक्ष्मी लॉन्समध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.     

Updated: Apr 5, 2019, 02:29 PM IST
आभासी जगात वावरणाऱ्यांना राहुल गांधींचा महत्वपूर्ण सल्ला

पुणे : सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. याचा वापर करण्यात तरुणाई अग्रेसर आहे. सोशल मीडियासारख्या आभासी दुनियेच्या गर्तेत अनेक जण अडकले आहेत. परंतू तुम्हाला यातून बाहेर येत वास्तव स्वीकारलं पाहिजे. असा सल्ला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तरुणांना दिला आहे. 

विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी पुण्यातील हडपसर येथील महालक्ष्मी लॉन्समध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राहुल गांधींनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. तरुणांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तर राहुल गांधीनी दिलखुलासपणे दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता सुबोध भावे आणि आरजे मलिष्का या दोघांनी केले. या कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि इतर स्थानिक नेते उपस्थित होते.

या कार्यक्रमादरम्यान सूत्रसंचालक सुबोध भावे यांनी राहुल गांधींना विचारलं की, 'तुम्ही गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक टीका सहन केल्यात. आणि येत्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहात. आभासी जगात राहणाऱ्या आणि स्वत:चा दुसऱ्यांमध्ये शोध घेणाऱ्यांना काय सांगाल'. यावर उत्तर देताना राहुल गांधी यांनी म्हटलं की, 'तुम्हाला तुमचे जीवन आभासी जगात व्यतीत करायचे आहे तर करा. पंरतू याने सत्य परिस्थिती बदलणार नाही. जी परिस्थिती आहे ती तशीच राहणार आहे.

एक दिवस सत्य तुमच्या समोर येणारच आहे. ज्या दिवशी सत्य समोर येईल. तेव्हा तुम्हाला सत्यात जगावे लागेल. तुम्हाला सत्य परिस्थितीचा स्वीकार करावा लागेल. स्वप्नांच्या दुनियेत राहायचं असेल तर रहा, काही अडचण नाही. शेवटी सत्य तुमच्यासमोर येणारच आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे पालणपोषण करावे लागेल. आपल्या कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागेल. ट्विटरवर अॅक्टीव्ह राहिल्याने तुमचे पोट भरणार नाही आहे. तुमचे जीवन आहे. योग्य काय त्याची निवड तुम्हाला करायची आहे. सत्य परिस्थितीत जगायचे की आभासी जगात.'

पुढे त्यांनी म्हटलं की, 'मला सत्य परिस्थितीत राहायला आवडते. आणि बरेच असे लोकं आहेत जे खऱ्या जगात राहतात, खरे बोलतात. एकमेकांसोबत प्रेमाने वागतात, संवाद साधतात. राग, द्वेषाने कोणाचाच लाभ होत नाही. हिंसा करून काहीच मिळत नाही.' राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर चंद्रपूर आणि वर्ध्यात ते जनसभेला संबोधित करणार आहेत.