'दोन दिवसांशिवाय मृतदेह बाहेर निघणार नाहीत'; इरसालवाडीवरुन गिरीश महाजनांची धक्कादायक माहिती

Khalapur Irshalgad Landslide :​ रायगडच्या खालापूर तालुक्यातील इरसालवाडी गावात दरड कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरड कोसळ्याने चार गावकऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी पोहोचत मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे.

आकाश नेटके | Updated: Jul 20, 2023, 09:42 AM IST
'दोन दिवसांशिवाय मृतदेह बाहेर निघणार नाहीत';  इरसालवाडीवरुन गिरीश महाजनांची धक्कादायक माहिती title=

Khalapur Irshalgad Landslide : मुसळधार पावसाने राज्याला जोरदार तडाखा दिला आहे. मुसळधार पावसामुळेच रायगडमध्ये (raigad news) मोठी दुर्घटना घडली आहे. रायगडमधील इरसाल गडाजवळील (Irshalgad) आदिवासी वाडीवर दरड कोसळून मोठा अपघात घडला आहे. जुन्या मुंबई पुणे महामार्गालगत असणाऱ्या आदिवासी ठाकूरवाडीवर ही दरड कोरळली (Irshalgad Landslide) असून यामध्ये 4 गावकऱ्यांचा आणि बचावकार्यासाठी आलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू ओढावला आहे. या घटनेनंतर स्थानिक नेत्यांसह मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घटनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. 

मुख्यमंत्र्यांनी काय सांगितले?

"जवळपास 16 ते 17 घरांवर दरड कोसळ्यामुळे लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून बाकीच्यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. एनडीआरएफ, टीडीआरएफ आणि स्थानिक बचाव पथक काम करत आहे. वरती रस्ता नसल्यामुळे कुठलेही वाहन नेण्याची व्यवस्था नाही. आपण बचावकार्याला प्राधान्य देत आहोत. मंत्री गिरीष महाजन वर असून ते कामावर लक्ष ठेवून आहेत," अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

मध्यरात्रीपासूनच मी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात - देवेंद्र फडणवीस

"रायगड जिल्ह्यातील खालापूरनजिक इर्शाळगड येथे दरड  कोसळण्याची घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही घटना कळताच काल मध्यरात्रीपासूनच मी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे. एनडीआरएफच्या 2 चमू घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या असून आणखी दोन चमू थोड्याच वेळात पोहोचत आहेत. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता ते गतीने होत आहे. प्राथमिक माहितीनुसार एकूण 48 कुटुंब येथे आहेत. सुमारे 75 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत," असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पाऊस सतत पडत असल्यानं बचावकार्यात अडथळा - अजित पवार 

"रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खालापूरनजिक इर्शाळवाडी परिसरात गावावर दरड कोसळून झालेली दुर्घटना मन पिळवटून टाकणारी आहे. दरडीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. अनेकांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. परंतु पाऊस सतत पडत असल्यानं बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे. जखमींवर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल अशी प्रार्थना करतो. या दुर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!,"  अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भीषण दुर्घटनेनंतर दिली आहे.

दोन ते तीन दिवसांशिवाय मृतदेह बाहेर निघणार नाही - गिरीश महाजन

"बचावकार्य सुरु असून पाऊस बराच असल्याने त्यामध्ये अडचणी येत आहेत. मी रात्री तीन वाजल्यापासून वरती आहे. माती घरांवर कोसळ्याने ती दबली आहेत. इथे येण्याचा मार्गही कठीण आहे. पाऊस जोरात असल्याने काम करणं शक्यच नाही. आतापर्यंत सहा मृतदेह मिळाले आहे. मातीचा ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढणं फार कठीण काम आहे. या गावाची लोकसंख्या अडीचशे आहे. त्यातील 70 ते 80 लोकांची माहिती मिळाली आहे. बचावलेल्यांचा आकडा किती असेल हे सांगणे कठीण आहे. नातेवाईकांकडे चौकशी सुरु आहे. मृतदेह बाहेर काढणं सुद्धा कठीण आहे. दोन ते तीन दिवसांशिवाय मृतदेह बाहेर निघणार नाहीत. कारण मातीचा ढिगारा घरांवर येऊन पडला आहे. पाऊसही थांबत नाहीये. इथे हेलिकॉप्टर येणे देखील शक्य नाही," अशी धक्कादायक माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.