महाड: महापुरानं कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली. दरड आणि भूस्खलनानं महाडच्या तळीये गावातील वाडीच मलब्याखाली गेली. या सगळ्या संकटातून नागरिक सावरत असताना आता नवं संकट समोर ठाकलं आहे. कोरोना, महापूर, दरड कोसळून झालेलं नुकसान आणि आता प्लेप्टोस्पायरोसिसचा आजार अशा अनेक संकटांशी तिथले नागरिक दोन हात करत आहेत.
महापूर, चिखल आणि कचऱ्यानं महाडमध्ये रोगराईचं नवीन संकट आलं आहे. महाडमध्ये आतापर्यंत प्लेप्टोस्पायरोसिसचे 15 रुग्ण आढळले आहेत. रोगराई रोखण्यासाठी आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे.
पूर ओसरल्यानंतर 8 दिवस उलटून गेले तरी महाड शहरातील चिखल आणि कचऱ्याचे ढीग उचलण्याचे काम अजूनही सुरू आहे. मात्र या कचऱ्याला आता दुर्गंधी येऊ लागली असून शहरात रोगराई पसरायला सुरुवात झाली आहे. महाडमध्ये लेप्टोचे 15 रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्लेप्टोस्पायरोसिस आजार नेमका काय?
हा आजार प्रामुख्याने जनावरांमध्ये आढळून येतो. त्यांच्यापासून तो माणसांमध्ये संसर्ग होत आहे. या विषाणूच्या 23 प्रजाती आहेत असं सांगितलं जातं. हा पावसाळ्यात प्रामुख्याने उद्भवतो. नाक, डोळे किंवा जखम झाली असेल तर त्यातून संसर्ग होऊ शकतो. ताप येणं, डोकेदुखी आणि अंगदुखी, सतत थंडी वाजणे त्यासोबत डोळ्यांना सूज आणि रक्तातील प्लेटलेट कमी होणं ही या आजाराची प्रमुख लक्षणं आहेत.