पालकांनो मुलांवर लक्ष द्या! जेली घशात अडकल्याने 9 महिन्याच्या बाळाचा मृत्यू

दुर्देवी घटनेने रायगड जिल्ह्यावर शोककळा, बाळाने जेली चॉकलेट गिळलं, पण ते त्याच्या घशात अडकलं आणि त्याचा श्वासचं बंद झाला

Updated: Jan 27, 2023, 10:12 PM IST
पालकांनो मुलांवर लक्ष द्या! जेली घशात अडकल्याने 9 महिन्याच्या बाळाचा मृत्यू title=

गुहागर :  गुहागरमधून (Guhaghar) एक दुर्देवी घटना समोर आली आहे. जेली (Jelly chocolate) घशात अडकल्याने 9 महिन्यांच्या बाळाचा दुर्देवी मृत्यू झाला. गुहागरमधल्या साखरीआगर गावात ही मन हेलावणारी घटना घडली आहे. उपचारासाठी डॉक्टरकडे नेत असताना रस्त्यातच बाळाचा मृत्यू झाला. गुहागार पोलिसात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. बाळाच्या नातेवाईकांनी उपचारासाठी गावातील डॉक्टरकडे नेलं. मात्र बाळाची स्थिती पाहता डॉक्टरांनी त्याला घोणसरे इथल्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. बाळाला घोणसरे इथं नेत असताना रस्त्यातच बाळाचा मृत्यू झाला.

याप्रकरणी गुहागर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. रिहांश तेरेकर असं मृत बाळाचे नाव आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना कोणतं चॉकलेट देत आहोत, तसेच ते चॉकलेट खाण्यायोग्य ते बाळ आहे की नाही, या गोष्टींकडे लक्ष ठेवणं गरजेचं असल्याचं या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आलं आहे.

साताऱ्यातही 1 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू
एक महिन्यापूर्वी साताऱ्यातही अशीच घटना घडली होती.  जेली चॉकलेट खाल्ले असता ते घशात अडकल्याने एक वर्षाच्या चिमुकीलचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिला तातडीने दवाखानात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. शर्वरी सुधीर जाधव असं दुर्दैवी मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. ही घटना साताऱ्यातील कर्मवीरनगरामध्ये घडली होती. घराशेजारी राहणाऱ्या एका लहान मुलीने शर्वरीला जेली चॉकलेट दिलं. शर्वरीने ते चॉकलेट गिळलं, पण ते तिच्या घशात जाऊन अडकलं, तिला श्वास घ्यायला त्रास सुरु झाली आणि काही वेळातच ती बेशुद्ध पडली. रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.