रेल्वेमार्गावर पाणी; कल्याण ते कर्जत, पुणे वाहतूक ठप्पच

 कल्याण ते कर्जत रेल्वेमार्गावर पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान, कल्याणहून पुण्याकडे जाणारा रेल्वेमार्ग ठप्प आहे. 

Updated: Jul 27, 2019, 10:21 PM IST
रेल्वेमार्गावर पाणी; कल्याण ते कर्जत, पुणे वाहतूक ठप्पच title=

ठाणे : कल्याण, शहाड परिसरात कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. कल्याण ते कर्जत रेल्वेमार्गावर पाणी साचल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान,  कल्याणहून पुण्याकडे जाणारा रेल्वेमार्ग ठप्प आहे. तर पनवेल कर्जत रेल्वेमार्गावरही पाणी आहे. मात्र कल्याण कसारा ही रेल्वे वाहतूक सुरळीत सुरु आहे. दरम्यान शहाड स्थानकावर सकाळी वेगळंच दृश्य पाहायला मिळाले आहे. 

पावसाने प्रशासनाची एकप्रकारे परीक्षाच पाहिली. कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे कल्याणहून पुण्याकडे जाणारा रेल्वेमार्ग ठप्प आहे. तर पनवेल कर्जत रेल्वेमार्गावरही पाणी आहे. पावसामुळे मुंबई गोवा हायवेही ठप्प झालाय. मुसळधार पावसामुळे बदलापूर कर्जत रेल्वेमार्गावर ठिकठिकाणी पाणी साचलंय. दुसरा पर्यायी मार्ग असलेल्या पनवेल कर्जत रेल्वे मार्गावरही पाणी आलंय. हे पाणी म्हणजे नदीचा प्रवाह वाटावा असं आहे. दुसरीकडं परशुराम घाटात डोंगर कोसळल्यानं हायवे ठप्प झाला. 

रेल्वे प्लॅटफॉमवर चक्क ऑटोरिक्षा धावताना पाहायला मिळाली. एरव्ही हा प्लॅटफॉर्म वर्दळीचा असतो मात्र मुसळधार पावसामुळे या भागातील रहावाशांनी घराबाहेर पडणं टाळले आहे. त्यामुळे रेल्वे प्लॅटफॉर्मवर गर्दी नव्हती अशात प्लॅटफॉम क्रमांक दोनवर अचानक रिक्षा धावताना दिसली. प्लॅटफॉर्मवर रिक्षा कोणी आणि का आणली हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही.

मुसळधार पावसामुळे कल्याणच्या बहुतांश भागात पाणी साचले. उल्हास, वालधुनी नद्यांना पूर आल्यानं अनेक नागरीक पाण्यात अडकले. या नागरिकांच्या सुटकेसाठी कल्याण डोंबिवली महापालिका, अग्निशमन दल, आपत्ती निवारण कक्षाचे कर्मचारी यांनी बचावकार्य सुरु केले. कल्याण जवळील कांबा, वरप याठिकाणी मोठ्या प्रमाणात पुरसदृश स्थिती असल्याने या भागातील नागरीकांच्या मदतीसाठी अग्निशमन दलाच्या जवानांना मदतीसाठी पाठवण्यात आले.