अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राज ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. यादरम्यान राज ठाकरे यांना एका अनोख्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं. राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. राज ठाकरे यांना मानणाऱ्या अशाच एका चाहत्याने राज ठाकरेंची भेट घेत त्यांच्याकडे एक मागणी केली. राज ठाकरे यांनीही या चाहत्याला निराश केलं नाही.
राज ठाकरे यांनी केलं बाळाचं नामकरण
पुण्यातील केसरी वाडा इथं कायकर्त्यांची बैठक संपवून निघत असताना अचानक एक जोडपं राज ठाकरे यांच्यासमोर उभं राहिलं. आपल्या बाळाचं नामकरण राज ठाकरे यांनी करावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. सुरुवातीला राज ठाकरेही संकोचले. पण महिलेने आग्रह कायम ठेवल्याने राज ठाकरे यांनी बाळाच्या डोक्यावरुन हात फिरवत बाळाचं नाव 'यश' असं ठेवलं
परभणीचं जोडपं
या दाम्पत्याचं नाव निशांत आणि विशाखा कमळू असं आहे. दोघेही राज ठाकरे यांचे निस्सीम चाहते आहेत. हे दाम्पत्य परभणीत राहाणारं असून निशात कमळू हे परभणीत मनसेचे कार्यकर्ते आहेत. वयाच्या सतराव्या वर्षापासून आपण मनसेचा निष्ठावंत कार्यकर्ता असल्याचं निशांत यांनी म्हटलं आहे. आपल्या मुलाचं नाव राज ठाकरे यांनीच ठेवावं अशी इच्छा माझी आणि पत्नीची इच्छा होती, राज ठाकरे यांनी ती इच्छा पूर्ण केल्याचा खूप आनंद झाला असून राज ठाकरे यांनी दिलेलं यश हे नवा अतिशय आवडल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मनसे अॅक्शनमोडमध्ये
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अॅक्शन मोडमध्ये आली असून राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार आहेत. सध्या त्यांनी पुण्यावर लक्ष केंद्रीत केलं असून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत.