Crime News : बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात राजस्थानी महिलांचे चमत्कार; भक्तांनीच केला भांडाफोड

Bageshwar Dham : मीरारोडमध्ये बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. याप्रकरणी राजस्थानातील 6 महिलांना पोलिसांनी अटक केलीय. खास चोरीच्याच उद्देशानं महिलांची हो टोळी कार्यक्रमात आली होती.

Updated: Mar 20, 2023, 08:12 PM IST
Crime News : बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात राजस्थानी महिलांचे चमत्कार; भक्तांनीच केला भांडाफोड title=

Bageshwar Dham :  बागेश्वर धाम सरकार म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र शास्त्री (dhirendra krishna shastri) यांचा मुंबईतील दरबार चांगलाच चर्चेत आला आहे. बागेश्वर बाबांच्या (Bageshwar Dham) मुंबईतील दरबारात राजस्थानी महिलांनी हातसफाई केली. बाबांच्या दरबारात हातसफाई करणाऱ्या या महिलांचा भक्तांनीच भांडाफोड केला आहे.  बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात सोन्याचे दागिने चोरणाऱ्या सहा महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलेल्या आव्हानानंतर धीरेंद्र शास्त्री हे चर्चेत आले. त्यानंतर धीरेंद्र शास्त्री यांनी संत तुकाराम महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानांमुळे त्यांच्यावर जोरदार टीका झाली. यांनतर देखील बागेश्वर बाबा देखील विविध कारणांमुळे चर्चेत येत आहेत. त्यातच आता बागेश्वर बाबा यांचा दिव्य दरबार मुंबईतील मीरा रोड (Mira Road) येथे शनिवारी पार पडला. हा कार्यक्रम चोरीच्या घटनांमुळ चर्चेत आला. 

मीरा रोड येथील एस.के. स्टोन मैदानात  बागेश्वर बाबा यांचा दिव्य दरबार पार पडला. दोन दिवस चाललेल्या या सत्संग सोहळ्याला लाखो भाविकांनी हजेरी लावली.  मात्र, या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात चोरट्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत लाखो रुपयांचे दागिने लंपास केले. 

खास चोरीसाठी राजस्थानातून बाबांच्या दरबारात आल्या महिला 

बागेश्वर महाराज यांच्या दिव्य दर्शन कार्यक्रमात महिलांच्या गळ्यातून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या महिला चोरांना मीरारोड पोलिसांनी अटक केली आहे. या महिला बावरीया गँग मधील असून त्या राजस्थान राज्यातल्या अलवर गावातील आहेत. या महिला फक्त चोरीच्या उद्देशाने राजस्थानात आल्या होत्या. चोरीच्या उद्देशानेच या महिला बाबांच्या दरबारात सहभागी होण्यासाठी मीरारोड मध्ये आल्या होत्या.

भाविकांची दरबारात जाण्यासाठी गर्दी झाल्याचा फायदा घेत या चोरट्या महिलांनी हाथ साफ करत लाखो रुपयांचे दागिने लंपास केले होते. यावेळी उपस्थित काही नागरिकांचे या महिलांकडे लक्ष गेले. सतर्क भक्तांनी या महिलांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या महिलांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या महिलांच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना झाली आहेत.