रक्षाबंधन; किडनी देऊन दिलं भावाला नवं आयुष्य

बहीण-भावाचा सण म्हणजे रक्षाबंधन. हा सण बहीण भावाच्या अतूट प्रेमाची आठवण करून देतो. या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दिर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.

Updated: Aug 7, 2017, 10:32 AM IST
रक्षाबंधन; किडनी देऊन दिलं भावाला नवं आयुष्य title=

उस्मानाबाद : बहीण-भावाचा सण म्हणजे रक्षाबंधन. हा सण बहीण भावाच्या अतूट प्रेमाची आठवण करून देतो. या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दिर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.

बहिणी लहानपणापासून भावाकडून विविध भेटवस्तू घेत असते. पण बहीण या सर्वांची विविध रूपाने परतफेड करतच असते. अशीच एक घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील गावसूद येथे घडली आहे. बहिणीने स्वत:ची किडनी देऊन भावाचा जीव वाचवला आहे. सुनंदा तुकाराम गायकवाड यांनी भाऊ प्रभू राम शिंपले यांनी किडनी देऊन त्यांना जीवनादान दिलं.

प्रभू यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यांना डायलिसिस करावे लागत होते. त्यावर एकच पर्याय होता की किडनी बदलणे. त्यावर पत्नीने किडनी देण्याची तयारी दर्शवली, परंतु ती मॅच झाली नाही. छोट्या बहिणीनेही तयारी दर्शवली होती; परंतु बहिणीला मधुमेह होता, त्यामुळे तिला किडनी देता आली नाही. शेवटी मोठी बहीण सुनंदा गायकवाड हिची किडनी जुळली. त्यामुळे विविध प्रकारच्या तपासण्या करून 1 जून रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली व खऱ्या अर्थाने बहिणीने रक्षाबंधनाला घेतलेली शपथ खरी केली. विशेष म्हणजे याच दिवशी प्रभू यांचा वाढदिवस असतो. 

माझ्या बहिणीने किडनी देऊन मला पुन्हा जन्माला घातले. दोन्ही किडन्या निकामी झाल्याने आयुष्य संपते की काय, असे वाटत होते, परंतु किडनी मिळाल्याने पुन्हा नव्या आयुष्याची सुरुवात करतोय असं भाऊ प्रभू शिंपले यांनी म्हटलं.