Pune Accident : 'गरीब वडापाव विकणारा दिसतो, पण नंगा नाच नाही', रविंद्र धंगेकरांची घणाघाती टीका

Pune Porsche Car Accident : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातानंतर आता राजकीय घडामोडींनी वेग धरलाय. अशातच रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पुणे पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

सौरभ तळेकर | Updated: May 20, 2024, 05:23 PM IST
Pune Accident : 'गरीब वडापाव विकणारा दिसतो, पण नंगा नाच नाही', रविंद्र धंगेकरांची घणाघाती टीका title=
Ravindra Dhangekar,Pune Porsche, Pune Car Accident

Ravindra Dhangekar On Pune Accident : पुण्याच्या कल्याणीनगरमधील (Kalyani Nagar Accident) अपघातानं सपूर्ण राज्य हादरलंय. मद्यपान करून बेदरकारपणे आलिशान पोर्शे कार (Porsche) चालवणा-या अल्पवयीन तरुणानं बाईकला धडक दिली. ही धडक एवढी मोठी होती की, अश्विनी कोष्टा आणि अनिस अहुदिया या दोघांचा जागीच मृत्यू झाला. मात्र धक्कादायक बाब म्हणजे या अपघातानंतर अवघ्या 17 तासांच्या आत अल्पवयीन आरोपीला पुण्यातील सुट्टीच्या कोर्टानं जामीन मंजूर केला. त्यामुळं अनेक प्रश्न उपस्थित होताहेत. पुण्यातील नामांकित बिल्डरचा मुलगा असलेल्या या आरोपीला जामीन दिला गेल्यानं आता पुण्यातील राजकीय घडामोडीने देखील वेग धरला आहे. काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी या प्रकरणावर भाष्य केलंय.

काय म्हणाले धंगेकर?

रस्त्याच्या कडेला कोणी गरीब वडापाव विकत असेल तर पोलीस रात्री 10 वाजता बंद करायला सांगतात.या पबमध्ये पहाटे पर्यंत दारू, ड्रग्स घेऊन नंगा नाच सुरु असतो. पोलिसांना हे दिसत नाही का? असा सवाल रविंद्र धंगेकर यांनी विचारला आहे. कल्याणीनगर मधील घटनेत कठोर कारवाई झाली पाहिजे म्हणजे परत कोणी पैश्यावाल्याची औलाद अशी मस्ती करणार नाही, असंही धंगेकर यांनी यावेळी म्हटलं आहे.

रविंद्र धंगेकरांच्या तीन मागण्या

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक ज्याने मुलाला ही आलीशान गाडी चालविण्यास दिली. याला तातडीने अटक झाली पाहिजे. अल्पवयीन मुलांना दारू विकणाऱ्या मुंढव्यातील Cosie रेस्टॉरंट,  Marriott suits मधील Black पब, Ballr पब या सर्व पब मालकांवर देखील अटकेची कारवाई करत हे पब कायम स्वरुपी बंद केले पाहिजे. येरवडा पोलीस स्टेशन मधील विकली गेलेली कायदा व सुव्यवस्था ज्यांनी अगदी किरकोळ कलमे लावून मुलाच्या जामिनासाठी रेड कार्पेट टाकून दिले. पैश्याच्या जिवावर दोघांना किड्या मुंगी प्रमाणे चिरडणाऱ्या या मुलाला पोलीस स्टेशन मध्ये बिर्याणी आणि पिझ्झा आणून खाऊ घातला. या पोलिसांवर कारवाई करत येथील अधिकारी कर्मचारी निलंबित केले गेले पाहिजे, अशी तीन मागण्या रविंद्र धंगेकर यांनी केली आहे. 

मुरलीधर मोहोळ म्हणतात...

कल्याणी नगर मधील अपघात प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी विविध पक्षांच्या शिष्टमंडळांनी केलीये. ही घटना पुण्याच्या संस्कृतीला मारक असल्याचे सांगत अशा घटना पुन्हा घडणार नाही याची खबरदारी पोलिसांनी घ्यावी. या संदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे भाजप कडून सांगण्यात आलं. पुण्यातील भाजप, मनसेसह कोरेगाव पार्क रहिवासी समितीच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आली, असं माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.