पुणे पोलीस दलातील रियल हिरो, मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या अटकेचा असा रंगला थरार

पुणे पोलिसांनी पेट्रोलिंगदरम्यान बाईकचोरी करणाऱ्या दोघांना अटक केली. तपासात हे दोघंही मोस्ट वाँटेड गुन्हेगार असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्यावर बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं. पुणे पोलिसांचं हे मोठं असल्याचं मानलं जातंय.   

सागर आव्हाड | Updated: Jul 19, 2023, 02:39 PM IST
पुणे पोलीस दलातील रियल हिरो, मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या अटकेचा असा रंगला थरार title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्याच्या कोथरूड (Kothrud) भागातून मंगळवारी रात्री दोन मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना (Terrorist) अटक करण्यात आली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांवर NIA कडून 5 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. गेल्या दीड वर्षांपासून ते फरार होते.  पुणे पोलीस दलातील (Pune Police) दोन जवानांनी कोथरुडमधून त्यांना अटक केली असून या पोलीसांचं सर्वत कौतुक होत आहे. कोथरूड पोलिस ठाण्याचे कर्मचारी प्रदीप चव्हाण आणि अमोल शरद नझन अशी या पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत. 

असा रंगला अटकेचा थरार
मंगळवारी रात्री पोलीस कर्मचारी गस्त घालत असताना बधाई चौकात मोटर सायकल चोरी करताना 3 तरुण दिसून आले. यावेळी ड्युटीवर असलेल्या कोथरूड पोलिस ठाण्याचे कर्मचारी प्रदीप चव्हाण आणि अमोल शरद नझन यांनी त्या 3 जणांना पकडले. पण यावेळी एकाने तिथून पळ काढला. मात्र चव्हाण आणि नझन यांनी दोघांना पकडुन ठेवले आणि त्यांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणलं. त्यांच्याकडे चौकशी केली असता सुरुवातील त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी खरी नावं सांगितली.

मोस्ट वॉण्टेड दहशतवादी
अटक करण्यात आलेल्या दोघांकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलीसही हैराण झाले. मोहमद युनूस साकी आणि इम्रान खान अशी आरोपींची नावं असून ते दहशतवादी असल्याचं समोर आलं. राजस्थानात ते मोस्ट वॉन्टेड आहेत. इतकंच नाही तर NIA त्यांच्यावर बक्षीसही जाहीर केलं होतं. पुणे पोलिसांनी याबाबतची माहिती NIA ला दिली असून पुढील चौकशी सुरु आहे. या दोघांकडून आतापर्यंत 4 मोबाईल आणि 1 लॅपटॉप जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली आहे. 

स्फोट घडवून आणण्याच्या तयारीत
30 मार्च 2022 रोजी राजस्थान पोलिसांनी एका कारमधून स्फोटके घेऊन जाताना अल्तमस पुत्र बशीर खां शेरानी याला अटक केली होती.  राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने या संदर्भात गुन्हा दाखल करून अनेकांना अटक केली होती. मात्र तेव्हापासून मोहमद युनूस साकी, इम्रान खान आणि फिरोज पठान हे तिघे फरार होते. आयएसआय पासून प्रेरणा घेऊन ही संघटना काम करत आहे.यातील इमरान खान आणि युनूस साकी यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. तर फिरोज पठाण हा फरार झाला असू त्याचा शोध सुरू आहे. याबाबत पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले की गेल्या 15 दिवसांपासून पुणे पोलीसांकडून शहरात जे कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे.ते त्याच यश आहे.आणि ज्या कर्मचाऱ्यांनी पकडलं आहे.त्यांना देखील मोठं बक्षीस देण्यात येणार असल्याचं यावेळी त्यांनी दिली.