नाशिक : पूर्व मतदार संघात विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांनी भाजपविरोधात बंडखोरी करत राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. राहुल ढिकलेंविरोधात त्यांनी बंडखोरी पुकारली आहे. देवळालीमध्ये विद्यामान आमदार योगेश घोलप यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने भाजपच्या सरोज अहिरे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादीच्या मंडाले यांनीही बंडखोरी केली आहे. नांदगावमध्ये शिवसेनेच्या सुहास कांदेना उमेदवारी दिल्याने भाजपच्या संजय पवार, रत्नाकर पवार, पंकज खताळ आणि सेनेच्या गणेश धात्रक यांनी बंड पुकारला असून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सटाण्यात राकेश घोडे यांनी भाजपच्या दिलीप बोरसे यांच्या विरोधात बंड पुकारले आहे.
नाशिक पश्चिममध्ये सीमा हिरेंविरोधात शिवसेनेच्या २२ नगरसेवकांनी एकत्र येत उमेदवारी दाखल केलीय. धनराज महाले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. चांदवडमध्ये भाजपाचे उमेदवार असलेले राहुल आहेर यांच्या विरोधात भाजपाकडून इच्छुक असलेले आत्माराम कुंभार्डे यांनी बंड करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
धुळे शहर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा घोळ समोर आला. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपला रामराम ठोकलेले माजी आमदार अनिल गोटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आपण महाआघाडीचे उमेदवार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांना विचारणा केली असता आपल्याला याबाबत काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करत असताना त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंब होते. गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावर त्यांनी भाष्य करणं टाळलं असलं तरी विजय आपलाच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
जालन्यातील बदनापूर विधानसभा मतदार संघावर शिवसेनेने दावा केला होता. पण हा मतदार संघ सेनेला न सुटल्याने शिवसेनेच्या दोन स्थानिक नेत्यांनी भाजप उमेदवार नारायण कुचेंविरोधात बंडखोरी करत तगडं आव्हान उभं केलंय. त्यामुळे भाजप उमेदवार कुचे यांची डोकेदुखी वाढलीय. शिवसेनेचे स्थानिक नेते राजू अहिरे यांनी शहरातून रॅली काढून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल तर केलाच पण या मतदार संघातून निवडून येऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना सरप्राईज देऊ अशी कोपरखळी भाजप उमेदवाराला मारली आहे. असे असलं तरीही मला कोणतीही चिंता नाही. मतदार संघात केलेल्या कामांच्या जोरावर मी पुन्हा निवडून येईन, असा दावा कुचे यांनी केला आहे.