"बॉम्बे हायकोर्टाचे नाव बदलून महाराष्ट्र हायकोर्ट करा"; भाजप खासदाराची लोकसभेत मागणी

Bombay High Court : या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्यानंतर कोर्टाने याबाबत हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. तसेच संसदेत हा प्रश्न सोडवावा असे म्हटले होतेे

Updated: Dec 7, 2022, 06:39 PM IST
"बॉम्बे हायकोर्टाचे नाव बदलून महाराष्ट्र हायकोर्ट करा"; भाजप खासदाराची लोकसभेत मागणी title=

Winter Session 2022 : आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरवात झाली आहे. वाढती महागाई, बेरोजगारी आणि चीन-भारत सीमेवरील परिस्थितीवर अधिवेशनात चर्चा  करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. मात्र अधिवेशनात महाराष्ट्राच्या खासदारांनी महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नावरुन केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यासोबत आजच्या दिवसात विविध मागण्यादेखील करण्यात आल्या आहेत. यावेळी मुंबई उत्तरमधील भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी (MP Gopal Shetty) यांनी केलेल्या मागणीची सर्वत्र चर्चा सुरुय.

मुंबईतील बॉम्बे हायकोर्टाचे नाव (High Court) बदलून महाराष्ट्र हायकोर्ट (Maharashtra High Court) करण्याची मागणी  भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकसभा हिवाळी अधिवेशनात केली आहे. देशातील उच्च न्यायालये ही त्या त्या राज्यातील नावांनी ओळखली जावी अशी मागणीसुद्धा गोपाळ शेट्टी यांनी केली आहे.

शहरांची नावे बदलली मात्र उच्च न्यायालयाची नावे न बदलल्याने सुप्रीम कोर्टात काही दिवसांपूर्वी  याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने आम्ही तुमची मागणी मान्य करणार नाही असे म्हटले होते. यासंदर्भात जो निर्णय घ्यायचा आहे तो संसदेच्या माध्यमातून होईल असेही कोर्टाचे म्हटले होते. त्यानंतर भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी हा मुद्दा आज लोकसभेत उपस्थित केलाय. शून्य प्रहरामध्ये त्यांनी हा मुद्दा उपस्थित करत ही मागणी केली आहे.

काय म्हणाले गोपाळ शेट्टी?

"1995 मध्ये बॉम्बेचे नाव बदलून मुंबईत करण्यात आलंय. पण बॉम्बे हायकोर्टाचे नाव तेच ठेवण्यात आले आहे. बॉम्बे नावाचे शहरच अस्तित्वात नाहीये त्यामुळे हे नाव योग्य नाहीये. महाराष्ट्राच्या नावाचा उच्चार हा महाराष्ट्रातील व्यक्तीसाठी अभिमानाचा विषय आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या नावाच्या बाबतीतही ही अभिव्यक्ती मिळायला हवी. बॉम्बे हायकोर्टाचे नाव बदलून महाराष्ट्र हायकोर्ट करण्याची आवश्यकता आहे," असे गोपाळ शेट्टी यांनी म्हटले आहे.