महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त करण्याची क्रांती सुरु झाली आहे, किरिट सोमय्या यांचा एल्गार

मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर किरिट सोमय्या यांनी घोटाळ्यांचे दोन आरोप केले आहेत, त्याबाबतची तक्रार करण्यासाठी सोमय्या कोल्हापूरमध्ये आहेत

Updated: Sep 28, 2021, 02:04 PM IST
महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त करण्याची क्रांती सुरु झाली आहे, किरिट सोमय्या यांचा एल्गार title=

कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या  (Kirit Somaiya) आज कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर घोटाळ्यांचे दोन आरोप केले आहेत. त्याबाबतची तक्रार कागल (Kagal) तालुक्यातील मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये (Murgud Police station) देण्यासाठी सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरच्या अंबामातेचं दर्शन घेतलं. यानंतर पत्रकारांशी बोलताना सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख भ्रष्टाचाराचा राक्षस असा केला. 

अंबामातेच्या चरणी मी प्रार्थना केली आहे, अंबामातेने जसा त्यावेळी राक्षसांचा वध केला होता, आता महाराष्ट्रात जो भ्रष्टाचाररुपी राक्षस आहे, त्याचा वध करण्यासाठी मला थोडीशी ताकद दे, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

एका बाजूला राज्याचे साडेबारा कोटी लोकं भ्रष्टाचाराविरोधात रस्त्यावर येऊन आम्हाला निरोप देतात, आमच्यासाठी प्रार्थना करतात आणि त्यावेळेला हे भ्रष्टाचाररुपी सरकार आम्हाला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात, पण महाराष्टाला भ्रष्टाचार मुक्त करण्याची क्रांती आता सुरु झाली आहे, अंबामाता आम्हाला आशिर्वाद द्या असा एल्गार सोमय्या यांनी केला. 

शिवसेना खासदार भावना गवळी यांचे सहकारी सईद खान याने मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता, कराडमध्य माझ्या गाडीवर दगडाने हल्ला करण्यात आला होता, त्याचा मास्टर माईंड सईद खान होता, आज तो सईद खान जेलमध्ये आहे, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

ईडीची चौकशी लागली की काहीजण गायब होतात, काहीजण हॉस्पीटलमध्ये अॅडमिट होतात, हसन मुश्रीफ, आनंदराव अडसूळ हॉस्पीटलमध्ये अॅडमिट होतात, पण माझं काम आहे ज्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला लुटलं आहे त्याचा घोटाळा उघडकीस आणणं आणि त्याचा पाठपुरावा करणं, असा वक्तव्य सोमय्या यांनी केलं आहे.

लोकायुक्ता समोर आज सुनावणी झाली ठाकरे सरकारने कोव्हीड हॉस्पीटलला परवानगी देत नियमावली मोडली, त्या घोटाळ्याची सुनावणी आजपासुन सुरु झाली, लोकायुक्तांनीही मान्य केलं की याचिकेत दम आहे, मला वाटतं न्याय मिळेले, असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे.