सोलापूर : सोलापुरात शहरात अत्यावश्यक कारणे सांगून होणारी रस्त्यावरची गर्दी पाहता प्रशासनाने निर्बंध आणखी कठोर घेण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकान, भाजीमंडई, दूध डेअरी आणि इतर खाद्यपदार्थांसाठी केवळ सकाळी सात ते एक वाजेपर्यंत मुभा दिली. तर दुसरीकडे होम डिलिव्हरी करणाऱ्या प्रत्येकाला ई-पास बंधनकारक करण्यात आलं आहे.
सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी याबद्दल माहिती दिली. राज्य शासनाने ई-कॉमर्स, हॉटेलमधील अन्नपदार्थांची होम डिलिव्हरी करण्यास परवानगी दिली आहे. या डिलिव्हरी करणाऱ्या लोकांकडून प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आलं आहे.
उद्यापासून संबंधित लोकांना सोलापूर महानगरपालिकेच्या पोर्टलवर या साठी उद्यापासून अर्ज करता येणार आहे. ओळखपत्र आणि RT-pcr चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र देणे यासाठी बंधनकारक असेल. एका तासात व्हेरिफिकेशन करून ई-पास पालिकेतर्फे देण्यात येईल. सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल अशी माहिती पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
कोरोनाचा कहर खूप वाढत असताना आज महाराष्ट्रात 63729नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. तर राज्यात आज 398 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.61 % एवढा आहे.