गडचिरोली : गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १५ पोलीस जवान शहीद झाले. एकीकडं देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या शहिदांच्या बलिदानाचा अभिमान. तर दुसरीकडं त्यांच्या जाण्यामुळं शोकाकूल नातलगांचा आक्रोश आहे. काळीज पिळवटून टाकणारा शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांचा आक्रोश. गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात १५ पोलीस शहीद झाले. त्यामध्ये नागपूरच्या मौदा चिचघाट गावच्या अमृत भदाडेचाही समावेश आहे. अडीच वर्षांपूर्वीच त्याचं लग्न झालं. त्याला अवघ्या १६ महिन्यांची कासवी नावाची मुलगी आहे. तिला सामोरं कसं जायचं, या विचारानंच अख्खा गाव दुःखसागरात बुडालं आहे.
मेहकरच्या शहीद राजू गायकवाड यांच्या घरीही असाच आक्रोश आहे. ३४ वर्षांचे राजू गेल्या ५ एप्रिलला मुलाच्या जावळासाठी घरी आले होते. दोन वर्षांपूर्वी राजू यांच्या मोठ्या भावाचं निधन झालं. आता राजू यांच्या जाण्यानं गायकवाड कुटुंबाचा आधारवडच हिरावला गेला.
देऊळगावराजा तालुक्यातले सर्जेराव खारडे यांच्या घरातही दुःखाला पारावार नाही. सर्जेराव यांच्या पश्चात आई कमलाबाई, लहान भाऊ, पत्नी आणि तीन वर्षांची मुलगी नयना असा परिवार आहे.
भंडारा जिल्ह्यातले ३ जवानही या हल्ल्यात शहीद झाले आहेत. लाखनी तालुक्यातले ३१ वर्षीय भूपेश वालोदे, साकोलीच्या कुंभली गावचे नितीन घोरमारे आणि लाखांदूर तालुक्यातले दयानंद शहारे यांचा त्यात समावेश आहे. सर्जिकल स्ट्राईक केवळ देशाच्या सीमेवर न करता नक्षलग्रस्त भागातही करावा अशी मागणी घोरमारे कुटुंबानं केली आहे.
बीड जिल्ह्यातल्या पाटोदा शहरातले शेख तौसीफ यांनी देखील प्राणांचं बलिदान दिल. शरीरसौष्ठवपटू अशी त्यांची ख्याती होती. तौसीफ यांच्या मागे वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांचे वडील अजूनही हॉटेलमध्ये मोलमजुरी करून कसंबसं घर चालवतात.
या शहिदांच्या बलिदानाचा बदला सरकार कसा घेणार, याकडं आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात. नक्षलींना मुँहतोड जवाब देऊ, असं पोलीस महासंचालकांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत सगळ्यांनीच सांगितलं. या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आता प्रतीक्षा आहे ती सरकार नक्षलवाद्यांची नांगी कशी ठेचणार, याचीच.