पुणे : सहारा समूहाचे प्रमुख सुब्रोतो रॉय हे त्यांच्या जामिनासाठी आवश्यक असलेले पाच हजार कोटी रुपये भरू शकले नाहीत. त्यामुळे सहाराच्या अडचणी वाढल्या असतानाच पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील अँबी व्हॅली पूर्णपणे ठप्प झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने अँबी व्हॅलीची विक्री करण्यासाठी लिक्विडेटर नेमण्याचे आदेश काही दिवसांपूर्वीच दिले. त्यानंतर अँबी व्हॅलीच्या डायरेक्टर बोर्डाला अँबी व्हॅली चालवणं कठीण होतं. अँबी व्हॅलीच्या उत्पन्नातून येणारा नफा लिक्विडेटरकडे जमा करावा लागत होता. त्यामुळे अँबी व्हॅलीतील कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यांचा पगार झाला नाही. त्यामुळे अँबी व्हॅलीच्या डायरेक्टर बोर्डाने अँबी व्हॅलीत काम करणाऱ्या अडीच हजार कर्मचाऱ्यांपैकी सोळाशे कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला. उरलेले ९२४ कामगार हे अँबी व्हॅलीमुळे बाधीत झालेल्या गावांमधील आहेत. त्यांना पुढील पंधरा दिवसांचा पगार दिला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर १९ ऑक्टोबरला अँबी व्हॅली पूर्णपणे बंद होईल.
दरम्यान, ज्या लोकांच्या अँबी व्हॅलीमध्ये खाजगी मालमत्ता आहेत ते लोक अँबी व्हॅलीमध्ये येऊ शकतील. अँबी व्हॅलीमध्ये एक इंटरनॅशनल स्कूल आहे, ज्यामध्ये साठ ते सत्तर विद्यार्थी शिकतात. हे स्कूल सुरु ठेवले जाईल. सहारा समूहाचे प्रमुख सुब्रोतो रॉय हे त्यांच्या जामिनासाठी आवश्यक असलेले पाच हजार कोटी रुपये भरू शकले नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सहारा समूहाच्या आठ हजार एकरहून अधिक जागेत पसरलेल्या अँबी व्हॅलीचा लिलाव करण्याचा निर्णय एप्रिल महिन्यात घेतला. तसेच, मुंबई उच्च न्यायालयाला त्यासाठी प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिले. त्यानंतर लिक्विडेटरने काम सुरु केले.
दरम्यान, एवढ्या मोठ्या संख्येने अँबी व्हॅलीच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अँबी व्हॅलीमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.