Marathi Sahitya Sammelan 2023: पहिल्याच दिवशी संमेलनाला गालबोट! CM शिंदेंच्या भाषणादरम्यान महिलांची घोषणाबाजी

Sahitya Sammelan Protest in front of CM Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंचं भाषण सुरु झाल्यानंतर आधी काही पुरुषांनी घोषणा दिल्या त्यानंतर भाषण संपताना महिलांनी घोषणाबाजी केली.

Updated: Feb 3, 2023, 02:28 PM IST
Marathi Sahitya Sammelan 2023: पहिल्याच दिवशी संमेलनाला गालबोट! CM शिंदेंच्या भाषणादरम्यान महिलांची घोषणाबाजी
Sahitya Sammelan Protest in front of CM Eknath Shinde

Sahitya Sammelan 2023 Protest in front of CM Eknath Shinde: वर्धा येथे आजपासून सुरु झालेल्या 96 व्या मराठी साहित्य संमेलनामध्ये (Sahitya Sammelan 2023) पहिल्याच दिवशी मोठा गोंधळ झाल्याचं चित्र पहायला मिळालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Protest in front of CM Eknath Shinde) यांनी उद्घाटन समारंभामध्ये भाषण सुरुवात केल्यानंतर काही मिनिटांमध्येच संमेलनाचे मंडपामधील काही पुरुषांनी उठून वेगळ्या विदर्भाची (Vidharbha Supporters) मागणी करणाऱ्या घोषणा दिल्या. त्यानंतर या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन मंडपाबाहेर नेलं. मात्र मुख्यमंत्र्यांचं भाषण समारोपाकडे आलं असतानाच पुन्हा मंचाजवळच्या पुढल्या रांगेत बसलेल्या काही महिलांनी वेगवळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या घोषणा देत लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. 

नेमकं घडलं काय?

मुख्यमंत्र्यांचं भाषण (CM Eknath Shinde Speech) सुरु झाल्यानंतर अचानक काही पुरुष आंदोलकांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे सुरक्षेमध्ये तैनात असलेल्या पोलिसांचा एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी या घोषणाबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेऊन मंडपाबाहेर नेलं आणि पोलिसांच्या गाडीमधून जवळच्या पोलीस स्थानकामध्ये नेलं. दरम्यान यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपलं भाषण सुरु ठेवलं आणि ते पूर्ण करत असतानाच अचानक पहिल्या काही रांगांमध्ये बसलेल्या महिला बॅनर घेऊन उभ्या राहिल्या आणि वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी घोषणाबाजी त्यांनी सुरु केली. वेगळ्या विदर्भाची मागणी करतानाच शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या महिलांनी केला.

'विदर्भ राज्य वेगळा करा'ची घोषणाबाजी

विदर्भवाद्यांनी साहित्य संमेलनादरम्यान आंदोलन केल्यानंतर महिला आंदोलकांना महिला पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं. पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेऊन संमेलनाच्या मंडपाबाहेर काढलं. 'विदर्भ राज्य वेगळा करा', 'शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्या', 'विदर्भ आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा' अशा घोषणा या आंदोलक महिला देत होत्या.

एवढी सुरक्षा असतानाही...

विदर्भवादी येऊन घोषणाबाजी करतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र एवढी कडेकोट सुरक्षा असतानाही आठ ते दहा विदर्भवादी आतमध्ये कसे शिरले. अगदी व्यासपीठावरुन काही अंतरावर असलेल्या रांगांमध्ये बसलेल्या महिला घोषणा देऊ लागल्या. यापैकी एका महिलेकडे तर छोट्या आकाराचं बॅनरही होतं. सुरक्षाकडं भेदून हे आंदोलक कसे आत आले यासारखे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणामुळे संमेलनाच्या सुरक्षेसंदर्भातील प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

अनेक दिवसांपासून सुरु आहे तयारी

३, ४ व ५ फेब्रुवारीदरम्यान वर्ध्यामध्ये साहित्य संमेलन पार पडत आहे. भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन या संमेलनाच्या निमित्ताने करण्यात आलेलं असून यामध्ये पुस्तक प्रदर्शन, चर्चासत्र, ग्रथंदिंडी यासारख्या कार्यक्रमांचा समावेश आहे. आज या संमेलनाचं उद्घाटन झालं असून मागील अनेक दिवसांपासून या संमेलनाची वर्ध्यात तयारी सुरु असल्याचं दिसत होतं. अगदी शहराच्या शुभोभिकरणापासून ते कार्यक्रमाच्या ठिकाणीही मागील आठवड्याभराहून अधिक काळापासून या संमेलनाची तयारी सुरु असल्याचं पहायला मिळालं.