गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : साईबाबांच्या जन्मभूमीवरून सुरू असलेला वाद पाथरीकरांच्या पथ्यावर पडला आहे. पाथरीत साईभक्तांची गर्दी अचानक वाढली आहे. पाथरी हे साईबाबांचं जन्मस्थळ असल्याचा दावा गेल्या ४५ वर्षांपासून करण्यात येतो आहे. साई जन्मस्थळाला मुख्यमंत्र्यांनी १०० कोटी रूपये देऊ केल्यानंतर शिर्डीवासियांनी पाथरी जन्मस्थळाला विरोध सुरू केला.
हा वाद पेटला असतानाच पाथरीकडे साईभक्तांची पावलं वळू लागली आहेत. त्यामुळे व्यावसायिक खूश आहेत. वाद सुरू झाल्यावर भाविकांच्या संख्येत अचानक १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मुख्यमंत्र्यांनी नव्याने घेतलेल्या भूमिकेमुळे शिर्डीकर समाधानी दिसत असले तरी पाथरीकर मात्र आता शांत होतील असं दिसत नाही. पाथरी जन्मस्थळ म्हणून घोषित झालं तर आपला व्यवसाय कमी होईल ही शिर्डीकरांची भीती लपून राहिलेली नाही. त्याचं प्रत्यंतर पाथरीतल्या वाढलेल्या गर्दीत दिसून येतं आहे.