आईचा अंत्यविधी आटोपून लेकीनं दिला १०वीच्या बोर्डाचा पेपर

परीक्षा.... नशीबाची 

Updated: Mar 4, 2020, 09:38 PM IST
आईचा अंत्यविधी आटोपून लेकीनं दिला १०वीच्या बोर्डाचा पेपर title=
आईचा अंत्यविधी आटोपून लेकीनं दिला १०वीच्या बोर्डाचा पेपर

हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे : 'आई.... मी खूप अभ्यास करेन आणि मोठी अधिकारी बनून तुझं स्वप्न नक्की पूर्ण करेन, नको ना सोडून जाऊ आम्हाला’… अशी आर्त हाक आंबेगाव तालुक्यातील धामणी गावातील स्माशनभुमीत साऱ्या गावासमोर ती देत होती. दहावीच्या पेपरला जायच्या आधीच स्मशानातून आलेली ही आर्त हाक होती ज्ञानेश्वरीची. 

आईचं निधन झाल्यानंतर, अंतिम समयी ज्ञानेश्वरीने तिच्या आईला हाक मारत आधिकारी बनण्याचं वचन दिलं त्यावेळी अंत्यविधीसाठी उपस्थित जन समुदायाच्या अश्रूंचा बांध फुटला. ही हृदय हेलावून टाकणारी घटना धामणी येथील गवंडीमळा येथे घडली. सविता दादाभाऊ गवंडी (वय 33) असं ज्ञानेश्वरीच्या आईचं नाव.

मंगळवारी सकाळी दहावीचा पेपर आणि सोमवारी रात्री साडेदहा वाजता ज्ञानेश्वरीच्या आईने जगाचा निरोप घेतला. जन्मदात्या आईच्या निधननंतर संकटांना घाबरून पाठीमागे न फिरता या लेकीनं मंगळवारी सकाळी आईचा अंत्यविधी आटोपून, जन्मदात्रीचं अखेरचं दर्शन घेतं मोठ्या धैर्याने संकटांना तोंड देत आईला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी दहावीचा बोर्डाच्या परीक्षेचा पहिला पेपर लिहिला.

गवंडी कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची. ज्ञानेश्वरीचे वडील दादाभाऊ हे मोलमजुरी करून दोन मुलांचं शिक्षण करतात. मात्र दोन वर्षांपासून सविता यांची तब्येत खालावली असल्यामुळे परिस्थितीखातर बँकेचं कर्ज हात उसने पैसे घेवून त्यांच्यावर अनेक ठिकाणी उपचार करण्यात आले. असं करुनही त्यांच्या हाती समाधान लागलं नाही. अखेर सविता यांनी सोमवारी रात्री या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे कुटुंबाची वाताहात झाली असून, साऱ्या परिसरात शोककळा पसरली आहे. दादाभाऊ गवंडी यांना तुषार आणि ज्ञानेश्वरी अशी दोन मुलं असुन तुषारने नुकतीच बारावीची परीक्षा दिली आहे. 

वाचा : ...म्हणून सैन्यदल वाहनांच्या चाकांना लावली जाते साखळी

दादाभाऊ गवंडी यांची परिस्थिती इतकी हलाखीची आहे, की पत्नी सविता यांच्या निधनानंतर त्यांचा दशक्रिया विधी करण्यासाठीही कुटुंबाकडे पैसे नाहीत. त्यामुळे त्यांना गरज आहे ती समाजातील दानशुरांच्या मदतीच्या हातांची. 
लहान वयातच आईच्या जाण्याने ज्ञानेश्वरीवर संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी पडली आहे. अशातच दहावीच्या परीक्षेचा डोंगर पार करण्याची जिद्द तिने मनात कायम ठेवली आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरीच्या या जिद्दीला आणि संघर्षाला गरज आहे ती म्हणजे एका भक्कम आधाराची.