संभाजी भिडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

संभाजी भिडे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी

Updated: Nov 8, 2019, 12:28 PM IST
संभाजी भिडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला  title=

मुंबई : राज्यामध्ये सत्तास्थापनेची कोंडी फुटत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजपातर्फे प्रत्येक पर्याय तपासून पाहिले जात आहे. यातून मार्ग काढण्यासाठी काल संभाजी भिडे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची उद्धव यांच्याशी भेट होऊ शकली नाही. काही वेळापुर्वीच ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर गेले आहेत. यावेळी काय चर्चा होणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. 

संभाजी भिडे यांची या सर्वामध्ये काय भूमिका आहे ? भाजपाला अशाप्रकारच्या मध्यस्थितीची गरज काय पडते ? सर्व पर्याय तपासूनही भाजपाला अजून मार्ग का सापडत नाही ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. संभाजी भिडे यांनी पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. 

भाजप शिवसेनेतली कोंडी फोडण्यासाठी भाजपच्या जवळच्या नेत्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीची वेळ मागितली होती. पण उद्धव ठाकरेंनी भेट दिली नाही. गुरुवारी अचानक भेड थेट मातोश्रीवर उद्धव यांची भेट घेण्यासाठी गेले. मात्र, भिडेंना भेट देण्याचे कोणतेही कारण नाही. आदराने त्यांना चहापाणी देऊन पाहूणचार करा. पण, भेटता येणार नाही, हे कळवा, असा आदेश 'मातोश्री'वरुन आला. त्यामुळे भिडे यांना उद्धव यांचे भेट मिळाली नाही.

दरम्यान, तेराव्या विधानसभेचा कार्यकाल आता संपत आल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज राज्यपाल यांच्याकडे राजीनामा देणार आहेत. तेरावी विधानसभा ही १० नोव्हेंबर २०१४ ला आमदारांच्या शपथविधीमुळे अस्तित्वात आली होती. आता येत्या ९ नोव्हेंबरला ५ वर्षे पूर्ण होत असल्याने या तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ हा संपुष्टात येणार आहे. या काळांत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्यामुळे एक तांत्रिक बाब म्हणून मुख्यमंत्री फडणवीस हे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत. अर्थात राज्यपाल यानिमित्ताने काही फडणवीस यांना काही वेगळे आदेश देतात का हे बघावं लागेल.