close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'शिवसेनेच्या आमदाराला ५० कोटींची ऑफर'

 विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांचे भाजपावर घणाघाती आरोप

Updated: Nov 8, 2019, 12:34 PM IST
'शिवसेनेच्या आमदाराला ५० कोटींची ऑफर'

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : १३ व्या विधानसभेचा कार्यकाळ संपायचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह सर्व विधानसभा आमदार राजीनामा देतील. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. भाजपाने अद्याप सत्तास्थापनेचा दावा केला नाही. या पार्श्वभुमीवर राज्यात आमदार फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. शिवसेनेचे सर्व आमदार रंगशारदामध्ये आहेत. काँग्रेसचे नेते जयपूरला गेले आहेत. या पार्श्वभुमीवर विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी भाजपावर घणाघाती आरोप केले आहेत. 

२५ ते ५० कोटींची बोली लावली जात आहे. शिवसेनेच्या आमदाराला ५० कोटींची ऑफर दिल्याचा आरोप वड्डेटीवार यांनी केला आहे. 'झी २४ तास'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. आमचे कोणतेही आमदार फुटून जाणार नाहीत. जर ते जयपूरला गेले असतील  फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले आहे. जर कोणाचे फोन आले तर ते रेकॉर्ड करा. आपण पुरावे गोळा करु आणि त्यांना तोंडावर पाडू असे आम्ही आमच्या आमदारांना सांगितले आहे.  
 
राष्ट्रपती राजवटी लागू झाल्यास त्याला भाजपाच जबाबदार असेल असा आरोप वड्डेटीवार यांनी भाजपावर केला आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री ठरला असेल तर द्यायला हवा. नसेल तर तसे सांगायला हवे असेही ते म्हणाले.  उगीच टांगती तलवार ठेवून राष्ट्रपती राजवट लागू करायची आणि त्याआडून कारभार करायचा असा भाजपाचा डाव असल्याचे त्यांनी म्हटले.