प्रफुल्ल पवार, झी २४ तास, रायगड : परिस्थितीशी झगडून यश मिळवणं म्हणजे काय असतं, हे रायगडच्या अलिबाग तालुक्यातील जान्हवी पाटीलनं दाखवून दिलंय... दहावीच्या परीक्षेत जान्हवीनं ९२.८० टक्के गुण मिळवलेत. जान्हवीची ही संघर्षकहाणी...
अलिबाग तालुक्यातील वाघोली या छोटयाशा खेडेगावात राहणारी जान्हवी पाटील... वडिलोपार्जित घरात कुटुंबाच्या वाट्याला आलेली छोटीशी खोली... घरात एक बल्ब, एक पंखा, संसाराला लागणारी भांडीकुंडी, स्वयंपाकाची लहानशी जागा... अशा वातावरणात जान्हवी अभ्यास करायची. वडील हंगामानुसार पडेल ते काम करणारे... तर आई दुसऱ्यांकडं मोलमजुरी करून संसाराला हातभार लावणारी... रोज चार किलोमीटरचा पायी प्रवास करत जान्हवी शाळेला जायची. दहावीच्या परीक्षेची फी भरायलादेखील तिच्याकडे पैसे नव्हते.
स्थानिक सेवाभावी संस्थेनं मदत केली म्हणून ती परीक्षेला बसू शकली. या सगळ्या अडचणींवर मात करत, जान्हवीनं दहावीला ९२.८० टक्के गुण मिळवले. मात्र आता पुढचं शिक्षण कसं करायचं, याची चिंता पाटील कुटुंबाला भेडसावतेय.
जान्हवीनं विविध स्पर्धांमध्येही बक्षीसं मिळवलीत. तिला चित्रकलेची आवड आहे. भविष्यात डॉक्टर बनायचं, तिचं स्वप्न आहे...
गरीबीचे चटके खात जान्हवी इथपर्यंत पोहोचलीय. आता तिला गगनभरारी घ्यायचीय... त्यासाठी गरज आहे तिच्या पंखांना बळ देण्याची... तुम्ही करणार ना जान्हवीला मदत?
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळवणाऱ्या या गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पाठवण्यासाठी थेट त्यांच्याच नावे पुढील पत्त्यावर धनादेश पाठवा
झी २४ तास, मॅरेथॉन फ्युचरेक्स, १४ वा मजला, ए विंग, ना म जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३
संपर्क क्रमांक - ९३७२९३७५६९