गाड्यांची तोडफोड-जाळपोळ करत समाजकंटकांचा रस्त्यातच धिंगाणा

रस्त्यावरून प्रवास करत असणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते आशिष कोरी यांच्या गाडीवरही या हल्लेखोरांनी हल्ला केला

Updated: Jan 1, 2020, 01:04 PM IST
गाड्यांची तोडफोड-जाळपोळ करत समाजकंटकांचा रस्त्यातच धिंगाणा title=

रवींद्र कांबळे, झी २४ तास, सांगली : सांगलीतील शंभर फुटी रोडवर काही समाजकंटकांनी जवळपास १० वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडलीय. यावेळी त्यांनी एका स्कॉर्पिओ गाडीलाही रस्त्यातच पेटवून दिलं. हल्लेखोरांत पाच जणांचा समावेश होता. यातील एकाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळालंय. ही तोडफोड आणि जाळपोळ का करण्यात आली? याचा मात्र अद्याप उलगडा झालेला नाही. उल्लेखनीय म्हणजे, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. 


सांगलीत गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ

या दरम्यान, रस्त्यावरून प्रवास करत असणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते आशिष कोरी यांच्या गाडीवरही या हल्लेखोरांनी हल्ला केला. कोरी यांनी तातडीनं पोलिसांशी संपर्क साधून मदतीची मागणी केली. पोलीसही तातडीनं हालचाल करत घटनास्थळी दाखल झाले. परंतु, एव्हाना हल्लेखोर फरार झाले होते.

पोलीस आणि अग्निशमन दलानं पेटलेल्या स्कॉर्पिओ गाडीची आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि घटनेवर नियंत्रण मिळवलं. यावेळी त्यांनी एका हल्लेखोरालाही ताब्यात घेतलं. इतर चार जणांना मात्र फरार झाले. 


सांगलीत गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ

धक्कादायक म्हणजे, रस्त्यातच कुणाच्याही गाड्यांची तोडफोड करत सुटलेल्या या हल्लेखोरांना हटकण्याचा आणि थांबवण्याचा प्रयत्न परिसरातील एका कुटुंबानं केला. परंतु, हल्लेखोरांनी त्यांच्यावरही दगडांचा मारा सुरू केला. त्यामुळे संबंधित कुटुंबही धास्तावलं आहे. 

घडलेला प्रकार अतिशय गंभीर असून पोलिसांनी तातडीने संबंधित गुन्हेगारंना शोधून योग्य ती कारवाई कारवाही करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते आशिष कोरी यांनी केलीय.