पुणे : शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत त्यांच्या रोखठोक राजकीय फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहेत. पण, क्रिकेटच्या मैदानात उतरुनही आपण चांगली फटकेबाजी करू शकतो याचे प्रात्यक्षिक त्यांनी पुणेकरांना दाखवून दिलं. त्यांच्या फटकेबाजीचा हा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे.
पुणे जिल्ह्यातील लांडेवाडी येथे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या मतदारसंघात संजय राऊत आले होते. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते सचिन अहिर, जुन्नरचे आमदार शरद सोनावणे होते.
आढळराव पाटील यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राऊत यांनी फलंदाजी केली. सचिन अहिर यांनी टाकलेल्या पहिल्याच चेंडूचा टप्पा पडण्यापूर्वीच त्यांनी ती आकाशात भिरकावला. त्यांच्या या फटकेबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दुसरा चेंडू आमदार शरददादा सोनावणे यांनी टाकला. तो ही त्यांनी स्ट्रेट ड्राईव्ह भिरकावला. यावेळी बोलताना राऊत यांनी 'आपण प्रत्यक्षात कधीही क्रिकेट खेळलो नाही. मात्र समोरच्याला चितपट करू शकतो. बॉलिंग, बॅटिंग आणि काहीही करू शकतो, असं विधान त्यांनी केलं.