Pune News: सारथी, बार्टी, महाज्योती CET परीक्षांचा पेपर पुन्हा फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेट विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकचा चव्हाट्यावर आला आहे. पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण दिसत आहे. शिवाय परीक्षेवरही बहिष्कार टाकण्यात आला आहे. पुण्याबरोबरच नागपुरातही पेपर फुटीचे प्रकरण समोर आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, आज पुणे येथील श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय वडगाव येथील परीक्षा केंद्रावर सारथी, बार्टी, महाज्योती संशोधन संस्थांसाठी घेण्यात येत असलेल्या पात्रता (CET) परीक्षेत झेरॉक्स प्रश्नपत्रिका देण्यात आल्या तर, प्रश्नपत्रिकेतील सी आणि डी प्रश्न पत्रिकेला सील नसल्याचे विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आले आहे. पेपर फुटल्याचे लक्षात येताच परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांनी सार्वजनिकरित्या बहिष्कार टाकत निषेध नोंदवला आहे. त्याचशिवाय परीक्षेवर बहिष्कार टाकण्यात आला आहे.
नागुपरमध्येही पीएचडी फेलोशिप ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परंतु या परीक्षेचे संपूर्ण पेपर पहिलेच फुटेलेले होते. तसंच विद्यार्थ्यांना झेरॉक्स कॉपी देण्यात आले, असा आरोप त्यांनी केला आहे. पेपर फुटल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे. सर्व विद्यार्थी कमला नेहरू महाविद्यालयावर मैदानात पटांगणामध्ये उभे राहून आंदोलन करत आहेत.
नागपुर आणि पुण्यात पेपर फुटीची घटना घडल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याचेच पडसाद छत्रपती संभाजीनगरमध्येही उमटले आहेत. देवगिरी महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवला आहे. काही विद्यार्थी त्यांच्या चिमुकल्या मुलांसोबतही येथे उपस्थित आहेत.