माझ्या पराभवामागे 'यांचा' हात, शशिकांत शिंदे यांचा थेट आरोप

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतील पराभव शशिकांत शिंदे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे

Updated: Nov 25, 2021, 03:37 PM IST
माझ्या पराभवामागे 'यांचा' हात, शशिकांत शिंदे यांचा थेट आरोप

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मला पाडण्यात संपुर्णपणे शिवेंद्रराजे भोसले यांचा हात असुन त्यांना राष्ट्रवादीच्याच काही लोकांनी मदत केल्याचा मोठा आरोप शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत केला आहे. राष्ट्रवादीतुनच विरोधकांना मदत होते याची खंत बोलुन दाखवत साताऱ्यातील मुख्य नेतेच विरोधकांना सोबत घेवुन खलबत करतात त्यामुळे राष्ट्रवादीच्या भवितव्याला मोठा धोका निर्माण झाला असल्याचं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. 

शशिकांत शिंदे यांचा अप्रत्यक्ष रोख हा रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे होता. साताऱ्यातुन चारही राजे बिनविरोध झाले मात्र मी राजा नाही त्यामुळे मी बिनविरोध झालो नाही अशी ही खोचक टिका त्यांनी केली असुन अजित पवार यांनी  माझ्या विजयासाठी मतदानाच्या दिवसापर्यन्त प्रयत्न केले असं शशिकांत शिंदे म्हणाले आहेत.

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणूकीत 100 टक्के राजकारण झाल्याचं सांगत शशिकांत शिंदे यांनी मी अखेरपर्यंत पक्ष पॅनलच्या निर्णयबाहेर आलो नाही ही माझी चूक झाल्याचं म्हटलं आहे. माझ्या पराभवानंतर काही जणांनी जल्लोष केला यावरुनच या कटाचा सूत्रधार कोण हे ओळखावं असा आरोप शशिकांत शिंदे यांनी केला आहे.

शशिकांत शिंदे यांचं काय चुकलं?
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत (Satara District Central Co-operative Bank Election) राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेले ज्ञानदेव रांजणे विजयी झाले. या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर आज शशिकांत शिंदे यांच्या पराभवावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

शशिकांत शिंदे यांच्या पराभवाच्या खोलात गेलो नाही, पण शशिकांत शिंदे यांनी ही निवडणुकू अधिक गांभीर्याने घ्यायला हवी होती, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. सहकारी संस्थांच्या निवडणूका पक्ष म्हणून लढवत नाही, असंही ते म्हणाले.