VIDEO: सेल्फी काढण्याच्या नादात तरुणी 150 फूट खोल दरीत, पुढे जे झालं ते चमत्कारापेक्षा कमी नाही

Satara young girl Selfie: मागे पुढे काय आहे, काय नाही हे न पाहता रिल्स, सोशल मीडिया लाईक्स फॉलोअर्स हेच डोक्यात असंत. त्यामुळे मृत्यूला आयतं आमंत्रण मिळतं.

Pravin Dabholkar | Updated: Aug 4, 2024, 08:39 AM IST
VIDEO: सेल्फी काढण्याच्या नादात तरुणी 150 फूट खोल दरीत, पुढे जे झालं ते चमत्कारापेक्षा कमी नाही title=
सेल्फीच्या नादात 150 फूट खोल दरीत

Satara young girl Selfie: सेल्फीच्या नादात जीव गेल्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसात समोर येत आहेत. तरीही धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढण्याचा तरुणाईचा मोह काही आवरताना दिसत नाही. पावसाचे दिवस असल्याने तरुण पिढीची पावलं डोंगर दऱ्यांच्या दिशेने वळू लागली आहेत. पावसाचा आनंद घेताना तो मोबाईल कॅमेरात कैद करत असताना तरुणाई देहभान विसरते. मागे पुढे काय आहे, काय नाही हे न पाहता रिल्स, सोशल मीडिया लाईक्स फॉलोअर्स हेच डोक्यात असंत. त्यामुळे मृत्यूला आयतं आमंत्रण मिळतं.साताऱ्यातही असाच एक प्रकार समोर आलाय.सेल्फीच्या नादात तरुणी खोल दरीत कोसळली. पण ट्रेकर्समुळे तिला दुसरं आयुष्य मिळालंय. कुठे आणि कशी घडली ही घटना? सविस्तर जाणून घेऊया. 

कोसळली 150 फूट खोल दरीत

सातारा येथील ठोसेघर रस्त्याला बोरणे घाट हा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. उंचावर असलेल्या या ठिकाणाहून पावसाचा आनंद घ्यायला मोठ्या संख्येने पर्यटक येतात. अनेकजण आपले कुटुंब आणि मित्रपरिवाराला सोबत आणून पावसाचा आनंद घेताना येथे दिसतात. येथे जवळच 150 फूट खोल दरी आहे. दरीच्या बाजूस कोणी जाऊ नये, असे वारंवार सांगण्यात येते. पण पर्यटक याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करताना दिसतात. त्यामुळे अनेकदा जीवावर बेतणारे प्रसंग ओढवताना दिसतात. 

पाहा व्हिडीओ

 

तरुणीला मिळाले नवे आयुष्य 

ठोसेघर रस्त्याला बोरणे घाटात पाच मुले आणि तीन मुली पर्यटनासाठी गेले होतेय यातील एक तरुणी बोरणे घाटाजवळच्या या खोली दरीसोबत सेल्फी काढण्यासाठी गेली. पण सेल्फी काढण्याच्या नादात युवती पाय घसरून जवळपास दीडशे फूट खोल दरीत कोसळली होती. या तरुणीचं आयुष्य संपलं असचं अनेकांना वाटलं. पण तिचं दैव बलवत्तर म्हणून काही ट्रेकर्स तिथे उपस्थित होते. त्यांनी जीवाची बाजी लावत या तरुणीचे प्राण वाचवले. शिवेंद्रसिंह राजे ट्रेकर्स ग्रुपमुळे या तरुणीला नवे आयुष्य मिळाले आहे.दरम्यान या तरुणीला आता उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आहे.

पर्यटन स्थळावर बंदी तरीही

सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर बंदी घालण्यात आली असताना सुद्धा पर्यटक जीव धोक्यात घालून अशा ठिकाणी जातायत अशा पर्यटकांवर कारवाईची मागणी होते आहे. तसेच आपल्या घरी परिवार वाट पाहत असतो,त्यामुळे जीव धोक्यात घालून सेल्फीचा मोह टाळावा,असे आवाहनदेखील पर्यटकांना करण्यात आले आहे.