'Devendra Fadnavis हे मोठा भावाप्रमाणे'; Satyajeet Tambe असं का म्हणाले? शरद पवारांचेही मानले आभार

Satyajeet Tambe says Devendra Fadnavis is like my elder brother: सत्यजीत तांबेंनी नाशिकमधील पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करताना भाजपा आणि फडणवीसांचा उल्लेख केला.

Updated: Feb 4, 2023, 06:13 PM IST
'Devendra Fadnavis हे मोठा भावाप्रमाणे'; Satyajeet Tambe असं का म्हणाले? शरद पवारांचेही मानले आभार
Tambe on Pawar And Fadnavis

Satyajeet Tambe says Devendra Fadnavis is like my elder brother: नाशिकमधील पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जिंकलेले अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबेंनी (Satyajeet Tambe) नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे आभार मानले आहेत. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आपल्याला निवडणुकीमध्ये मदत केल्याचं सांगत सत्यजीत तांबेंनी पक्षाकडून वेळेत एबी फॉर्म न मिळाल्याने फॉर्मवर इंडियन नॅशनल काँग्रेस लिहूनही आपला अर्ज अपक्ष म्हणून ग्राह्य धरण्यात आल्याचं म्हटलं. सत्यजीत तांबेंनी फडणवीस यांना पुस्तक प्रकाशासाठी दिलेलं आमंत्रण, भारतीय जनता पार्टीकडून न मागता मिळालेला पाठिंबा यासारख्या गोष्टींबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचेही आभार मानले आहेत. 

पक्षाने संधी दिली नाही

पक्षाच्या संघटनेमध्ये एखादी जबाबदारी आपल्याला द्यावी यासाठी वारंवार आपण दिल्लीमधील प्रभारींबरोबर चर्चा करत होतो असं सांगतानाच सत्यजीत तांबेंनी कायमच आपल्याला डावलण्यात आलं. वडील आमदार असल्याचं कारण देत आपल्याला विधानसभेचं तिकीट देण्यात आलं नाही. तसेच निवडणूक लढायची असल्यास वडिलांच्या जागी लढवावी असं सांगण्यात आलं. मात्र हे आपल्याला मान्य नव्हतं असं सत्यजीत तांबे म्हणाले. एकीकडे पक्षाकडून होत असणारं दुर्लक्ष तर दुसरीकडे फडणवीसांच्या माध्यमातून मिळालेला पाठिंबा यासारख्या गोष्टी एकाच वेळी घडत होत्या, असं सत्यजीत तांबे म्हणाले. 

फडणवीस ते वाक्य म्हणाले अन्...

"माझ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होता. यासाठी मी सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रित केलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आमंत्रित केलं होतं. त्यांनी मला पत्र पाठवलं होतं की मी येऊ शकत नाही. मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरेंनाही बोलवलं होतं. वेगवगेळ्या क्षेत्रातील लोकांना मी बोलवलं होतं कारण शहरविकास हा राजकारणापलीकडचा विषय आहे. याच कारणामुळे मी अजितदादांनाही बोलवलं होतं पण शेवटच्या क्षणी त्यांना येणं जमलं नाही. सत्यजितला संधी द्या नाहीतर आमचा त्याच्यावर डोळा आहे, असं या कार्यक्रमामध्ये भाषणात फडणवीसांनी म्हटलं.  तिथून चर्चा सुरु झाली, असं मला वाटतं. त्यांना सभागृहामध्ये या वाक्यानंतर मोठा प्रतिसाद मिळाला. माझ्या जवळच्यांची भावना त्यांनी बोलून दाखवली होती म्हणून हा प्रतिसाद त्यांना मिळाला," असं सत्यजीत तांबे म्हणाले. 

फार आधीपासून ओळखतो

फडणवीस आणि आपली फार आधीपासून ओळख असल्याचं सत्यजीत तांबेंनी सांगितलं. सत्यजीत यांनी दोन दशकांपूर्वीचा उल्लेख करत, "ते माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. माझे दिवंगत बंधू राजीव राजळे जे आमदार झाले. त्यावेळी या आमदारांनी युथ फोरम नावाचा तरुण आमदारांचा ग्रप तयार केला होता. तेव्ही मी त्यांच्याबरोबर जायचो तेव्हा आमची (फडणवीस आणि माझी) ओळख झाली," असंही सांगितलं.

मनसेनंही केली मदत

सत्यजीत तांबेंनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आपली मदत केल्याचं सत्यजीत तांबे म्हणाले. "भाजपाने पाठिंबा मागितला नसतानाही भाजपाच्या लोकांनी मला मदत केली. मी देवेंद्रजींचे आभार व्यक्त करतो. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मला मदत केली. शिवसेनेच्या लोकांनी मला मदत केली. काँग्रेसचे 100 टक्के लोक होते. मनसे, रासपच्या लोकांनी मदत केली. 100 संघटनांनी मदत केली मागच्या चार निवडणुकांचं अॅनलिसीस केलं तर सर्व पक्षीय लोकांनी आम्हाला मदत केली आहे. भाजपाचे अनेक कार्यकर्ते हे सांगत होते की, आम्ही कायम तुम्हाला मदत केली आहे. निवडणूक संपल्यावर पुढल्या क्षणी आपण सर्व मतदारांचे असतो," असं सत्यजीत तांबे म्हणाले.

पवारांचेही मानले आभार

तसेच, "पवारसाहेबांचे आभार मानतो कारण त्यांनी सुरुवातीलाच हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न असून तो त्यांनी सोडवला पाहिजे अशी भूमिका घेतली," असंही सत्यजीत तांबे म्हणाले.