परीक्षेत कॉपी करताना सापडले तर या कायद्याखाली थेट जेलवारी

परीक्षेत कॉपी करण्याचं प्रमाण गेल्या काही वर्षात प्रचंड वाढलंय. 

Updated: Feb 20, 2022, 08:27 PM IST
परीक्षेत कॉपी करताना सापडले तर या कायद्याखाली थेट जेलवारी  title=
प्रातिनिधिक छायाचित्र

पुणे :  विद्यार्थ्यांसाठी (Student) एक मोठी आणि अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आता यापुढे परीक्षेत कुणी कॉपी करताना आढळला तर त्याची खैर नाही. कॉपी बहाद्दरांना यापुढे थेट जेलची हवा खावी लागणारं आहे. ऑनलाईन सत्र परीक्षेत कॉपी करताना आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं दिले आहेत.  (savitribai phule pune university orders to file criminal case if found copying in online session exam)
  
परीक्षेत कॉपी करण्याचं प्रमाण गेल्या काही वर्षात प्रचंड वाढलंय. मात्र या कॉपीबहाद्दरांना चांगलाच चाप लावण्यासाठी आता विद्यापीठांनी जालीम उपाय शोधून काढला आहे. कॉपी करणाऱ्यांवर विद्यार्थ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याचे आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं दिले आहेत. 

सध्या पुणे विद्यापीठाच्या ऑनलाईन सत्र परीक्षा सुरू आहेत. ऑनलाईन परीक्षा देताना गेल्या दोन वर्षात अनेक विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळून आले होते, त्यामुळेच कॉपी बहाद्दरांना चाप लावण्यासाठी विद्यापीठानं कडक पाऊल उचललं आहे.

ऑनलाईन परीक्षेदरम्यान होणाऱ्या गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी विद्यापीठानं 30 जणांच्या टीमची नियुक्त केली आहे. एखाद्या विद्यार्थ्यानं गैरमार्गाचा अवलंब केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. दोषींवर कारवाई करण्यासाठी आयटी कायद्याचा बडगा उगारण्यात येईल.

त्यामुळे विद्यार्थ्यांनो परीक्षा देताना गैरमार्गाचा वापर करू नका. कॉपीचा शॉर्टकट निवडाल तर तुमची थेट जेलमध्येच रवानगी तर होईलच. पण भवितव्य अंधारात जाईल.