पुण्यात नवीन वर्षात शाळेची घंटा वाजणार

 पुण्यात नवीन वर्षांत शाळेची (Pune School) घंटा वाजणार आहे. 

Updated: Dec 25, 2020, 07:33 AM IST
पुण्यात नवीन वर्षात शाळेची घंटा वाजणार
संग्रहित छाया - पीटीआय

पुणे : कोविड-१९च्या (Covid-19) प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा आणि महाविद्यालय बंद आहेत. आता कोरोना विषाणूचा संसर्ग (Coronavirus) आटोक्यात आला आहे. त्यामुळे टप्याटप्याने अनेक संस्था, आस्थापना आणि कार्यालये, प्रवासी वाहतूक सुरु करण्यात येत आहेत. काही जिल्ह्यात शाळा (School) सुरु करण्यात परवानगी देण्यात आली आहे. पुण्यात नवीन वर्षांत शाळेची (Pune School) घंटा वाजणार आहे. ४ जानेवारीपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू होणार आहे. पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शासन नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे, असे आदेश दिले आहेत.

पुण्यात नववी ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरु होणार असल्याने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी RTPCR चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंध करणाऱ्या अटी शर्थींचे पालनही बंधनकारक करण्यात आले आहे. साथरोग अधिनियम तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी यासंदर्भातले आदेश दिलेत. कोरोना प्रतिबंध करणाऱ्या सर्व अटी शर्थींचे पालन करुन शाळा सुरु होणार आहेत. शाळा सुरु करताना शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांच्यामार्फत १० नोव्हेंबर २०२० रोजी निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना आणि अटींचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

शाळेत स्वच्छता तसेच निर्जंतुकीकरण विषयक सुविधा असाव्यात ही अट आहे. थर्मल स्कॅनर किंवा थर्मल गन, पल्स ऑक्सिमीटर, जंतुनाशक, साबण, पाणी या आवश्यक वस्तू शाळा प्रशासनाने ठेवणे बंधनकारक आहे. शाळा वाहतूक सुविधांचेही निर्जंतुकीकरण नियमितपणे करावे लगाणार आहे. तसेच  शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविड १९ साठीची RTPCR चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.