माळशेज घाटाकडे पर्यटकांची पाठ, दरडींचा धोका की आणखी काही? वाचा यामागचं कारण

Maharashtra Malshej Ghat : घाट परिसरात मोठ्या प्रमाणात शुकशुकाट असल्याचं पाहायला मिळत आहे. तुम्हीही माळशेजला जाण्याचा बेत आखताय? थांबा.... 

सायली पाटील | Updated: Jul 27, 2023, 10:08 AM IST
माळशेज घाटाकडे पर्यटकांची पाठ, दरडींचा धोका की आणखी काही? वाचा यामागचं कारण  title=
sec 144 imposed in malshej ghat tourists refused to stop amid the risk of landslide

Maharashtra Rain Alert: पावसाळा सुरु झाल्यानंतर काही ठराविक ठिकाणांना भेट देण्याची जणू परंपराच आहे. अशाच काही ठिकाणांमध्ये अनेकांच्याच पसंतीची जागा म्हणजे माळशेज घाट. मुंबईपासून जवळ आणि नगर कल्याण महामार्गावर येणाऱ्या या माळशेज घाटाची वाट, खोल दरी, त्यातच अडकलेले ढग आणि घाटमाध्यावरून कोसळणारे धबधबे असं एकंदर चित्र इथं दरवर्षी पाहायला मिळतं. जे पाहण्यासाठी इथं येणाऱ्या पर्यटकांचा आकडाही मोठा. पण, यंदाच्या वर्षी मात्र हे चित्र काही अंशी बदलल्याचं पाहायला मिळत आहे. 

एरव्ही घाटवाटेत येणाऱ्या लहानमोठ्या धबधब्यांपाशी थांबून त्यात भिजण्याचा आणि वाटेतच आलेल्या मुसळधार पावसाचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक इथं हजेरी लावतात. यंदा मात्र हा आकडा मोठ्या फरकानं कमी झाला आहे. माळशेज परिसरात दरडींचा धोका पाहता इथं पर्यटकांना धबधब्यांच्या परिसरात थांबण्याची आणि गर्दी करण्याची परवानही नाही. 

घाट परिसरात कलम 144 सुद्धा लागू करण्यात आला आहे. ज्याअंतर्गत पाचजणांपेक्षा अधिक व्यक्ती इथं एकत्र येऊ शकत नाहीत. परिणामी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेले हे आदेश पाहता आता पर्यटकही कोणताही धोका पत्करताना दिसत नाहीयेत. ज्यामुळं पावसानं चांगलाच जोर धरलेला असताना कधीकाळी पर्यटकांनी फुलणाऱ्या माळशेजमध्ये आता शुकशुकाट जाणवत आहे. 

स्थानिक रोजगारांवर गदा 

माळशेज परिसरामध्ये घाटरस्ता सुरु होण्याआधीच मोरबे धरण - मुरबाड मार्गावर अनेक आदिवासी पाड्यांमधील मंडळी रानभाज्या, फळं आणि काही पदार्थ विक्रीसाठी घेऊन येतात. तर, काही मंडळी घाटांमध्ये सुरक्षित वळणं बघून तिथं कणिस, मॅगी, भजी, चहा असे पदार्थ विकताना दिसतात. कोसळणारा पाऊस, वाफाळत्या भुईमुगाच्या शेंगा, भजी आणि चहा या अशा पदार्थांची जोड या पावसालाही वेगळंच रुप देते. पण, सध्या मात्र स्थानिकांच्या या रोजगारावर गदा आली आहे. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Rain Updates : पुढील काही तास अतीवृष्टीचे; मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रासाठी 'रेड अलर्ट' 

घाटात पोलीस पहारा असल्यामुळं वाहनं पुढे सरकत असली तरीही मध्ये कोणाही थांबताना दिसत नाहीये. आजुबाजूला निसर्गाची मुक्तहस्तानं सुरु असणारी उधळण पाहण्यासाठीही इथं कोणी थांबत नसून यामागे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आणि दरडी कोसळण्याची भीती कारणीभूत ठरत आहे. राज्यात सातत्यानं वाढणारा पावसाचा जोर पाहता दरडी कोसळण्याचं प्रमाणही वाढत आहे. त्यामुळं कोणतंही मोठं संकट ओढावण्याआधीच प्रशासन सतर्क झालं असून, नागरिकांना या निर्णयात सहकार्य करण्याचं आवाहन केलं जात आहे. त्यामुळं तुम्हीही पावसाच्या निमित्तानं माळशेजला जाणार असाल तर जाण्यापूर्वी दोनदा विचार करा...!